क्रीडा थोडक्यात: १) भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण नापास झाला. पण त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. २) सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. ३) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ४) भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांची ‘आयसीसी’ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन नामांकनात निवड केली आहे. इंग्लंडच्या विरुद्धच्या तीन कसोटींमध्ये २४ बळी घेत १७६ धावा केल्या. तर जो रुटने द्विशतकासह ३३३ धावा करत ६ बळी घेतले. तसेत कायले मेयर्स हा सुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. ५) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध कशा प्रकारे कामगिरी उंचावता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. “चौथ्या कसोटीसाठी मोटेराच्या खेळपट्टीत फारसे बदल होणार नाहीत. तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळल्याने फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार नाही,” असे रहाणे म्हणाला.