क्रीडा महत्त्वाचे: १) लिलावात इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर फलंदाज जेसन रॉयवर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला असून त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ज्यांची निवड झाली त्यांचं…विशेषतः ज्यांच्यावर जास्त बोली लागली त्याचं मी अभिनंदन करतो…आयपीएल बघायला मजा येईल”, अशा आशयाचं ट्विट जेसन रॉयने केलं आहे. २) जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेची २२वी मानांकित जेनिफर ब्रॅडी यांच्यात शनिवारी दुपारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. तीन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरलेल्या ओसाकासमोर अंतिम फेरीत कडवे आव्हान नसल्याने ती चौथ्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. तर अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत एकही अव्वल खेळाडूचा सामना करावा न लागला तरी पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी ब्रॅडी उत्सुक आहे. ३) भारताच्या अंकिता रैना हिने रशियाची साथीदार कॅमिला राखीमोव्हा हिच्या साथीने संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यावहिल्या डब्ल्यूटीए जेतेपदावर नाव कोरले. अंकिता-कॅमिला या जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या जोडीवर विजय मिळवला. अंकिता-कॅमिला जोडीने अॅना ब्लिंकोव्हा आणि अॅनास्तेशिया पोटापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ अशी मात केली. या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत ९४व्या स्थानी मजल मारली आहे. ४) आयपीएल’ला प्रायोजक करण्यासाठी दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व्हिवोकडून ४४० कोटी रुपये मिळतात. गतवर्षी भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे ‘बीसीसीआय’ने हा करार स्थगित केला होता. पण इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठी प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल निर्मिती कंपनी व्हिवोचे पुनरागमन झाले आहे.