क्रीड थोडक्यात: १) भारत-इंग्लंड यांच्यात रंगलेल्या पाच सामन्याची टी-२० मालिका भारताने ३-२ अशी जिंकली आहे. एकीकडे विजयाचा आनंद साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. शेवटच्या सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकल्याने संघाच्या मानधनामधील ४० टक्के दंड आयसीसीच्या एलिच पॅनेलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ठोठावला आहे. तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने संबंधित कारवाई मान्य केली आहे. २) युवराज सिंग आणि युसूफ पठाण आणि गोलंदाजांच्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांने पराभव करत जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेला आपल्या नावे केली आहे. भारताने २० षटकांत ४ बाद १८२ धावाचे आव्हान दिले होते. सनथ जयसूर्याने ४३ धावा केल्या. कौशल्य वीररत्ने (३८), चिंतका जयसिंघे (४०) यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला ७ बाद १६७ धावाच करता आल्या. ३) यंदाचे मेक्सिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यांनी आपल्या नावे केला आहे. ज्वेरेवने अंतिम सामन्यात ग्रीसच्या आघाडीचा टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासचा ६-४, ७-६ असा धुवा उडविला. ४) आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ही भारतीय पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले असल्याचे दिसले. १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदाची कमाई केली आहे. यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ५) दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सीए भवानी देवीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारतातची पहिली तलवारबाज असून भवानीने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात विक्रम आपल्या नावे केला आहे.