क्रीडा थोडक्यात: १) वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेटला बसल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन क्रिकेटपटू, वानखेडे स्टेडियमचे १० कर्मचारी आणि ८ संयोजन समिती सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता मुंबईतील जैव-सुरक्षित वातावरणात असलेल्या १४ प्रक्षेपण कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयपीएलवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. २) एजीएमके स्टेडियमवर उझबेकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाचा ००-१ असा पराभव झाला. सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या त्यामुळे त्यांना यश आले नाही. तथापि, उझबेकिस्तानच्या माफतुना शोयिमोवाने ८७ व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली आणि त्या एकमेव गोलने संघाला विजय मिळवून दिला आहे. ३) भारतीय क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे नवे प्रमुख शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्याता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्याहन मिळेल, असे परखड मत व्यक्त केले आहे. तसेच लहानात लहान लीगमधून संशयास्पद हालचालींचे समूळ उच्चाटन करणे हे आपल्यापुढील मोठे आव्हान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आयपीएलसारखे सामने भ्रष्टाचारमुक्त आहेत, मात्र स्थानिक आणि राज्य टी-२० लीगमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत आहेत. त्यामुळे या स्तरावरील सट्टेबाजी होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे.