क्रीडा थोडक्यात: १) मार्च महिन्यात होणाऱ्या विश्व बीच व्हॉलिबॉल स्पर्धेवर जर्मनीच्या महिला संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीच व्हॉलिबॉलमध्ये महिला खेळाडू बिकिनी घालतात. बिकिनी घालण्यास मनाई केल्यामुळे बीच व्हॉलिबॉल स्टार कार्ल बॉर्गर आणि ज्युलिया स्यूड यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कतार हा एकमेव असा देश आहे, जिथे खेळाडूंना कोर्टवर बिकिनी घालण्यास मनाई आहे, असे या दोघींचे मत आहे. २) मोटेरा स्टेडियममध्ये पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीची आशा बाळगण्यात येत आहे; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाजांची भूमिकाही फिरकीपटूंप्रमाणेच महत्त्वाची असेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहे आणि बुधवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टेडियमची नवी खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंटू ठरली आहे. ३) कर्णधार श्रेयस अय्यरने (९९ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेले दिमाखदार शतक आणि अनुभवी धवल कुलकर्णीच्या (५/४४) भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राचा सहा गडी आणि १६ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला. जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेले २८० धावांचे लक्ष्य मुंबईने ४७.२ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सलग दुसऱ्या विजयामुळे मुंबईने आठ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले आहे. ४) इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण तो त्याचा १००वा कसोटी सामना आहे. या शिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. मोटेरा मैदानावर होणाऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २२वा विजय असेल. सध्या भारतात कसोटीत सर्वाधिक २१ विजयाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.