सुमेधा उपाध्ये
देण्याची वृत्ती असणे किंवा ती निर्माण होणे हे आजच्या युगातही अत्यंत महत्वाचे आहे. जे आपल्याकडे आहे त्यातील काही भाग हा ज्याच्याकडे काही नाही त्याला देणे यालाच आपल्या संस्कृतीत दान असे म्हणतात. दान देण्याची सवय आपल्याला अगदी लहान असल्यापासून नकळत लावली जायची. आजी सोबत किंवा कुणाही मोठ्यासह मंदिरात गेल्यानंतर किमान दहा पैसे हातावर ठेकवले जायचे तिथल्या पेटीत टाकण्यासाठी. तिथल्या पुजाऱ्यांनी तीर्थ दिलं की त्यांना नमस्कार करून त्यांनाही काही पैसे देण्याची प्रथाच होती. त्यातून मंदिरांचा नित्य पूजापाठ सुरू राहायचा. तेलवात होत होत रहायची. तसंच मंदिरात सेवा देणाऱ्यांचा उदरनिर्वाह सुरू रहायचा. अलिकडच्याकाळात हे सर्व वाढिस लागले आणि मोठमोठ्या मंदिरांमधून अनेक समाजसेवा सुरू झाल्या आहेत.
आपल्या कमाईतील काही भाग हा समाजासाठी देणे अत्यंत आवश्यक असते. दानामुळे किती लाभ होतो वगैरे चर्चा होत राहते. ती होत राहिल पण त्यातील एक सूत्र अचल आहे ते म्हणजे दान केल्याने मानसिक समाधान नक्कीच लाभते. धर्मशास्त्रानुसार दान केले कि ती वस्तू आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. क्रिया प्रतिक्रिया निरंतर सुरू राहते त्यामुळे जे जेवढे देतो त्याच्या कित्तेकपटीने अधिक परत मिळते. दानासाठी पैसेच हवे असे नाही. सेवा ही सुद्धा दानातच येते. सेवा रूग्णाची करा किंवा गोरगरीबांची करा नाहीतर देवाची करा. त्याचे फळ एकच आहे.
देण्याची वृत्ती वाढली की लगेचच आपल्या आयुष्यातही सकारात्मकता येऊ लागते. आपण अनेक लोकांकडून ऐकले असेल की मी अमुक एका देवाला नवस बोललो आणि त्यानंतर थोडेच दिवसात माझे काम झाले. मी नवस फेडला. तर इथेही देण्याची इच्छा प्रबळ झाली म्हणून कार्य झाले आणि त्यातून लाभ झाला. म्हणजेच जेव्हा देण्याचे महत्व लक्षात येते तेव्हाच मनात सकारात्मक बदल होत जातात. आपण वर्षानुवर्षे सत्यनारायणाची कथा ऐकत आलोय. एका गरीब ब्राह्मणाने ती कथा ऐकली नंतर त्याने म्हणटले की आज दिवसभरात जर काही मिळाले तर मी सत्यनारायण करेन. म्हणजेच त्याच्या मनात देण्याचा भाव जागृत झाला आणि त्यानंतर त्याला भरपूर भिक्षा मिळाली. त्यानेही सत्यनारायणाचे व्रत केले. पण आपण याकडे फार लक्ष देत नाही. आजवर आपल्या धर्मशास्त्रातही अनेक गोष्टींच्या आणि उदाहरणाच्याद्वारे परोपकाराचे संस्कार केले आहेत. पण कित्तेकदा त्यामागील अर्थ जाणून न घेता आपण ते जुनाट विचार म्हणून टाकून देतो. आता या विज्ञान युगात दानाचे प्रकार बदलत गेलेत. अलिकडे रक्तदानाचे महत्व किंवा अवयव दानाचे महत्व खूप मोठ्याप्रमाणात सांगण्यात येत आहे. ते योग्यच आहे.
दानाचा अर्थच असा आहे की आधी द्या नंतर प्राप्त करा. देणे सुरू झाले की येणे सुरू होते. जेव्हा आपण दुसऱ्यांना सुख देतो तेव्हा आपल्या दारातही सुख येते. प्रत्येकालाच सुखाची प्राप्ती हवी आहे. मला दु:ख हवे असे म्हणणारी एक कुंतीच होती कारण तिला माहित होते दु:ख असेल तर कृष्ण सहवास आहे. पण आता असा विचार करणारी व्यक्ती दुर्मिळ आहे. मनुष्य जन्म हा सर्व प्राप्त केले तरी अखेर मोक्षासाठी आहे. हेच आपण विसरलेले आहोत. मोक्ष हवा म्हणून दान करणारे किती आणि सुख हवे यासाठी दान करणारे किती हे पाहणेही गंमतीचे आहे. तरीही देण्याने वाढते हे निश्चित आहे. दानाने पुण्यलाभ होतो आणि त्याचा उपयोग आपले आयुष्य सुखी होते. समाधानी होते. ज्याच्याकडे नाही त्याला निश्चित त्याची गरज पाहून दान द्यावे. दान सत्पात्री असावे. गरज नाही त्याला दान देऊन उपयोग नाही. आहे तरीही घेतो तो लोभी असतो. लोभी व्यक्तीस दिल्याने आपण त्याच्या लोभ वाढिस पुरक ठरतो. मात्र, नाही रे गटाला आहे रे गटाने वेळोवेळी देत राहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरील सुख आपल्याला निश्चित समाधान देते. परमात्म्याने सर्वांसाठी ही सृष्टी निर्माण केली. सर्वांचा त्यावर समान हक्क आहे. मात्र जीवनाच्या संघर्षमय स्पर्धेत काही माणसे आपल्या कर्मानुसार मागे पडतात. त्यांच्याकडे काही नाही कारण तुमच्याकडे अधिक आहे. हे सत्य स्वीकारले तर निश्चित देण्याची उर्मी निर्माण होईल आणि दानाच्या महात्म्यास जाणून देत राहिलो की निश्चित वाढत रहाल. म्हणून सत्पात्री दान निश्चित करत राहणे आणि सर्वांत्र समानतेच्या ज्योती तेवत ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)