मुक्तपीठ टीम
येत्या मंगळवारपासून पुणे ते सातारच्या फलटण पर्यंतचा प्रवास वीजेवर चालणाऱ्या रेल्वेगाडीनं करणं शक्य होणार आहे. सध्या ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी असेल. पुणे रेल्वे विभागाने पुणे ते फलटण दरम्यान विशेष प्रवासी डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती जाहीर केली आहे.
ही ट्रेन ३१ मार्चपासून सुरू होईल आणि फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांसाठी असेल. ३० मार्च रोजी या रेल्वेचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. ही विशेष ट्रेन फलटण ते पुणे येथून सुटेल आणि सुरवाडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड येथे थांबेल, असे पुणे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ३१ मार्चपासून पुणे येथून पहाटे ५.३० वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल व सकाळी ९.३५ वाजता फलटण येथे पोहोचेल. परतल्यावर ट्रेन-०४१३५ फलटण येथून सायंकाळी ६ वाजता सुटेल आणि पुण्याला रात्री ९.३५ वाजता पोहोचेल.
फलटण येथील स्थानिक राज्य सरकारचे अधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्त यांना नोडल अधिकारी केले गेले आहे. ते प्रवाशांना सेवेचा लाभ घेण्यासाठी क्यूआर कोडसह खास पास देतील. ट्रेनमध्ये इतर कोणत्याही प्रवाशांना परवानगी मिळणार नाही. स्टेशनवर केवळ पास घेणाऱ्यांनाच परवानगी असेल. रविवारी ट्रेन चालणार नाही. यापूर्वी रेल्वेने दौंड ते पुणे दरम्यान अत्यावश्यक सेवेत असलेल्यांसाठी विशेष लोकल ट्रेन सेवा सुरू केली होती.
पाहा व्हिडीओ: