आकाश दीपक महालपुरे / व्हा अभिव्यक्त!
आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी,घट जाती राऊळात.
राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा,ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक.राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे.अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो.समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात.या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते.महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे.
याचाचं काहीसा असा एक प्रत्यय म्हणून अशीचं एक बाब जवळपास दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये देशोदेशींच्या माध्यमांमध्ये झळकली आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली.उभ्या जगाचे लक्ष या विचार,संस्कृतीच्या महाराष्ट्राकडे लागले आणि अवघे शिक्षणविश्व नव्या चैतन्याने फुलून गेले.महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला हा सर्वोच्च मान म्हणजे,शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने रुजविलेल्या महान परंपरेचा वारसा आजही तितकाच शुचिर्भूत आणि शाबूत आहे,याचा थेट पुरावा होता.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या परितेवाडी नावाच्या एका शाळेतील रणजीतसिंह डिसले नावाच्या शिक्षकांने जगाच्या शैक्षणिक नकाशावर महाराष्ट्राच्या झेंडा फडकावला आणि महाराष्ट्राच्या संपन्न शिक्षण परंपरेचा शिरपेचात मानाचा नवा आणि कोरा तुरा खोवला.
महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ.पंजाबराव देशमुख आदी ध्येयनिष्ठ शिक्षकवर्गाने सजवलेली शिक्षण प्रसाराची पालखी महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांच्या खांद्यावरून आश्वस्तपणे पुढे जात आहे,याची खात्री उभ्या देशाला पटली.
शैक्षणिक विश्वाच्या परंपरांना तंत्रज्ञानामुळे प्राप्त झालेल्या नवतेलाही झळाळी मिळावी,असे कर्तृत्व शिक्षकवर्गाची नवी पिढी बजावत आहे,हे डिसले गुरुजींनी सिद्ध करून दाखविले.क्यूआर कोडच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक क्रांती घडवण्याचे निर्विवाद श्रेय अधोरेखित करणाऱ्या या शिक्षकामुळे,महाराष्ट्राच्या शिक्षक-विद्यार्थी परंपरेचा वारसा तसूभरही कमी नाही,ज्ञानदानाचे श्रेष्ठत्व कायम आहे,हे वास्तवही अधोरेखित झाले.यात एकटे डिसले गुरुजीच नव्हे,तर राज्याच्या विविध जिल्ह्यातील लहान मोठ्या गावांतील शाळांमधील शिक्षकांनीदेखील कोरोना काळातील शिक्षणाची पालखी खांद्यावरून खाली न ठेवता नवनव्या प्रयोगांनी संकटकाळातही शिक्षणाची गंगा वाहती राहावी,यासाठी प्रयोगशीला पणाला लावली.शिक्षणाने प्रगती होते,समाज विकसित होतो,देश प्रगत होतो हे खरे; पण आपण मिळवलेले ज्ञान,कौशल्ये हे आपल्या ‘स्व’ सुखापुरते मर्यादित न ठेवता.समाजाभिमुख व्हावे आपण कार्य करतो.समाजासाठी लढतो,उभे राहतो, समाजाला योगदानाच्या रूपात काही देऊ शकतो तेव्हाच हे शक्य आहे व हीच मानसिकता विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याचे अवघड काम आजही शिक्षक खऱ्या अर्थाने करत आहे.आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पारंपरिक शिक्षण व आधुनिक शिक्षण असे दोन प्रवाह दिसतात.जीवन कौशल्यावर आधारित किमान कौशल्ये प्राप्त करून देणारे शिक्षण हे भविष्यात उपोगी पडणारे आहे.कुशल मनुष्यबळ हीच आपली आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असणार आहे.अगदी आधुनिक पद्धतीच्या शेतीपासून ते अवकाश शास्त्रापर्यंतच तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करून राष्ट्राला घडवणारी,राष्ट्राला स्वतंत्र वेगळी ओळख प्राप्त करून देणारी पिढी निर्माण करण्याचे मोठे आव्हान मात्र आपल्या सर्वांपुढे आहे आणि मग तेच धर्म,प्रांत,जात, देश या मर्यादा ओलांडून गेल्याशिवाय ग्लोबलाझेशनच्या खर्या अर्थापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही.म्हणून सर्व थरातील शिक्षणाला व शिक्षकांना आज खऱ्या अर्थाने आता महत्व येत आहे.माझ्यामधले ‘दि बेस्ट’ देण्याची तळमळ असणारे शिक्षकच आजकाल हाडाचे शिक्षक ठरत आहे.
ज्याप्रमाणे अंधारात चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात दिवा दिला की त्याला प्रकाश मिळतो,आणि मग तो न अडखळता मार्गक्रमण करू शकतो.अगदी त्याच प्रकारे आजही काही आदर्श शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश देत आहे.हा ज्ञानरूपी प्रकाश विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक संकटांमध्ये मार्गदर्शन करण्याचे महान कार्य देखील करत आहे.मात्र माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होत असलेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बर्याच वर्षापासून काहीश्या प्रमाणात सर्वत्र उदासपणे पार पडतांना दिसत आहे.महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेलाही प्रश्न पडावा एवढ्या त्रयस्थपणे शिक्षण दिन येत आणि जात आहे.राज्याच्या शैक्षणिक परंपरेला साजेस कर्तुत्व बजावणाऱ्या शिक्षकांची दखलच या शिक्षक-दिनी घेतली जात नाही आहे.भावी पिढ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविणारा शिक्षकवर्ग आजकाल सरकारी कामांच्या विळख्यात गुरफटत चालला आहे.त्यातून वेळ काढून शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यास करावी लागणारी कसरत तर अभूतपूर्व आहे.शिक्षकांना अनेक समस्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे.अनेक शाळांतील शिक्षकांना आजही पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि निवृत्तीनंतरच्या लाभांसाठी देखील महिनोमहिने सरकारच्या शिक्षण खात्याकडे डोळे लावून ताटकळत बसावे लागते आहे.शिक्षक पुरस्कार हा देखील आदर्श शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसही हातभार लावणारा असल्याने,शिक्षकांचे कौटुंबिक स्वास्थ्य स्थिर होण्याकरिताही साहाय्यभूत होत असतो.मुळात अलीकडे वेतन वाढीची नियमित प्रक्रिया देखील थंडावलेली असल्याने पुरस्काराच्या निमित्ताने मिळणाऱ्या विशेष वेतनवाढी हे केवळ स्वप्न राहिल्याने उपोषण,आंदोलनाच्या मार्गाने शिक्षकांच्या नाराजीला सनदशीर मार्गाने तोंड फुटत आहे.शासनाच्या सर्व उपक्रमांत शिक्षकाचा सहभाग आणि योगदान असताना त्याला पुरस्कारापासून आणि त्याच्या योग्य त्या मानधनापासून वंचित का ठेवले जाते,या प्रश्नाचा टाहो शिक्षकांच्या अनेक संघटना गेल्या काही वर्षभरापासून सरकारच्या कानाशी फोडत असूनही तो आवाज मंत्रालयापर्यंत का पोहोचत नाही,हे एक खऱ्या अर्थाने रहस्यमय गुढच आहे.
खरतरं,कोणत्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील शाळाशाळांच्या वर्गांमधून घडवले जात असते,असे उद्गार १९६०च्या दशकात नेमलेल्या शैक्षणिक आयोगाचे प्रमुख डॉ. डी. एस. कोठारी यांनी काढले होते.त्यास आता सहा दशके लोटली,तरीही त्यांचे हे उद्गार सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो,गांभीर्याने घ्यायला तयार नाही,असेच काही गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात शिक्षण खाते ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्यावरून म्हणता येत आहे.पण मुलांना एक चांगला नागरिक बनवायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना अशी वागणुक मिळाल्यावर तो शिक्षक कशावरुन मुलांना उत्साहाने शिकवेल.? असा प्रश्न आजही खर्या अर्थाने पडत आहे.
कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार शिक्षकाने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा शिक्षक राहतो अज्ञात.
(आकाश दीपक महालपुरे हे राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त युवा लेखक व कवी आहेत)
संपर्क ७५८८३९७७७२