मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या गेले काही महिने आक्रमकतेने राज्यातील आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. त्यांनी सत्तेतील तीनपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करत ईडी पिडा मागे लावली आहे. लवकरच उरलेल्या तिसऱ्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे घोटाळेही बाहेर काढणार असल्याचे ते म्हणालेत. पण त्याधी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर साखर कारखान्याचा विषय जाहीर केला आहे. सहकारीचा खासगी झालेल्या साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या हा पारनेर साखर कारखाना पवार कुटुंबाशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या कारखान्याच्या विक्रीतील घोटाळ्याप्रकरणी लवकरच पुरावे सादर करणार असल्याचा इशारा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्याच्या जरंडेश्वरनंतर साखर कारखान्याप्रकरणी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पारनेर कारखान्याच्या विक्रीत घोटाळ्याचा सोमय्यांचा आरोप
- ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला.
- पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत.
- ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे.
- पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे.
- जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.”
जरंडेश्वरसारखेच अहमदनगरमधील पारनेर!
- “पवार परिवाराचे घनिष्ठ मित्र, उद्योजक त्यांनी यामध्ये २३ कोटी रुपये हा साखर कारखाना घेण्यासाठी दिले होते.
- ३२ कोटीत लिलाव झाला.
- अतुल चोरडियांनी हे पैसे दिले.
- यात कोणकोण आहेत? कारण, जरंडेश्वरमध्ये असंच झालं.
- ६५ कोटीत कारखाना दिला गेला आणि ते ६५ कोटी कोणी भरले?, ओंकार बिल्डर्स.
- त्या बिल्डर्सचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय? पवार परिवार काय म्हणतं आमच्याशी संबंध म्हणजे जगाशी संबंध.
- तर ओंकार बिल्डर आज सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्याकडून अजित पवारांच्या पत्नीच्या नावाने लोन लिस्ट देण्यात आलं.
- अशाच प्रकारचं कटकारस्थान पारनेर कारखान्यात दिसत आहे.
आता महाराष्ट्रात क्रांती येत आहे!
- “महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवलं आहे, घोटाळेबाज ठाकरे सरकारला आता ठिकाण्यावर आणायचं.
- म्हणून तुम्ही पाहा, हसन मुश्रीफच्या कपाटात काय होतं किंवा त्याच्या कंपनीच्या चोपड्याच्या खाली काय होते.
- ही माहिती माझ्याकडे आली.
- मी काय देव नाही. महाराष्ट्रातील जनता आता माझ्याकडे येऊन माहिती देत आहे.
- दोन दिवसांचा जो अनुभव आहे, त्यावरून हेच सांगतो की आता महाराष्ट्रात क्रांती येत आहे.