मुक्तपीठ टीम
म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेत असलेलं सरकार उलथवून सेनेनं पुन्हा एकदा हुकूमशाही लादली. त्याविरोधात सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी सैनिक गोळीबारासारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. आतापर्यंत गोळीबारात ६८ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. सैन्याचा रक्तपात असह्य झाल्यानं शांतीप्रिय नागरिकांपैकी काहींनी रोखण्याचा प्रयत्नही केला. सिस्टर रोझ अशांपैकीच एक.
मायित्किना येथे गोळीबार सुरू असताना सिस्टर रोझ सैनिकांसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी सैनिकांना बजावले, “लहान मुले, स्त्रिया आणि आंदोलकांवर गोळीबार करणे थांबवा. आधी मला गोळी मारा. जोपर्यंत तुम्ही येथून जाणार नाही किंवा मला मारणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही.”
सिस्टर रोजच्या या आवाहनानंतर सैनिकांनी बंदुका खाली टाकल्या आणि हात जोडत गुडघ्यावर बसले. नंतर अधिकाऱ्यांनी ननला आश्वासन दिले की, यापुढे असे होणार नाही, त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. अटकेच्या २०० विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यांगून येथेही आंदोलने करण्यात आले. लोकांनी कर्फ्यूचे उल्लंघन केले. या आंदोलकांच्या कव्हरेजवर सैन्य सरकारने देशातील पाच माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले आहेत.
म्यानमारमधील सत्तांतरापासून लोक सैनिकी कारभाराचा विरोध करत आहेत. प्रत्येक वेळी आंदोलकांवर कडक कारवाई करताना दिसतात. सत्तेत असलेल्या सैन्याने लोकशाही समर्थकांशी काटेकोरपणे व्यवहार करण्यास सांगितले आहे. देशाचे सर्वोच्च नेते आंग सॅन सू की यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर म्यानमारमध्ये आंदोलने सुरू आहेत. नोव्हेंबरच्या निवडणुकीत सूच्या पक्षाने जोरदार विजय मिळविला होता, परंतु सैन्याने हा निकाल जाहीर करण्यास नकार दिला.
पाहा व्हिडीओ: