मुक्तपीठ टीम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आज सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम उद्घाटक व नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी ह्यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करून ऊर्जा क्षेत्रामध्ये नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
महापौर आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणतात, “पुरातन काळात सौर व वायु ऊर्जेचा वापर होत होता, विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचा विसर पडला, परंतु आज पुन्हा विज्ञानात ह्या अक्षय ऊर्जेचे महत्त्व पटले व त्याचा वापर सुरू झाला”. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात ह्या अश्या प्रकल्पांचे मोठे योगदान असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले.
प्राध्यापक निरंजन देशकर ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथील विद्यार्थ्यांना धन्यवाद देत त्यांनी विद्यापीठ विज बिलांचे अंकेक्षण करून ह्या प्रकल्पाला आवश्यक असलेली माहिती पुरविली. व्यवस्थापन परिषदेने ह्या प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे विद्यापीठ जवळपास ८० लक्ष रुपये वार्षिक बचत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सौर ऊर्जेसोबतच इतर नवीन पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत सुद्धा वापरात आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठामध्ये प्रस्तावित एनर्जी पार्कची माहिती सुद्धा त्यांनी दिली. मुख्यत्वे ह्या योजने अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पांपैकी पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प आहे. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता सुभाष डुंबरे, महासंचालक, महाऊर्जा, सूरज वाघमारे, अपर महासंचालक, वैभव पाटोडे, प्रादेशिक संचालक महाऊर्जा आणि चामट, विद्युत निरीक्षक ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला कुलगुरू डॉ संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे ह्यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.