मुक्तपीठ टीम
गणपतीबाप्पा बुद्धीचा देवता. त्यामुळेच त्याचा उत्सव हा धार्मिक सांस्कृतिकच नाही तर समाजप्रबोधनाचाही सोहळा. आजही बहुतांश ठिकाणी हा जनजागरणाचा वसा जपला जातोय. मुंबईच्या कांदिवलीतील चारकोपमध्ये राहणाऱ्या गाडे कुटुंबाच्या घरचा उत्सव हा पर्यावरणपूरक आहेच पण समाजोपयोगी उपक्रमांसाठीही ओळखला जातो. तिथं अत्रे कट्टा उपक्रम चालवणारे राजेश गाडे हे दरवर्षी वेगळी कल्पना राबवतात. यावर्षाचा उत्सवही अपवाद नाही. पर्यावरणपूरक मूर्ती बसवत
या वर्षी ते लाल मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. कारण शाडूची मातीही चिकट असते. अनेक वेळा जलाशयांच्या जलस्त्रोतांना जाम करु शकते. त्यामुळे त्यांनी लाल मातीचा पर्याय निवडला. ही माती पुढे रोपांना उपयोगी पडते. याआधीही ते शाडूच्या मातीच्याच मूर्ती निवडत. एवढंच नाही तर समाजहितासाठी ते वेगळे उपक्रमही राबवतात. एका वर्षी त्यांनी बिया मिसळून मातीचे बीज मोदक प्रसादात दिले. हार-फुले, प्रसादाऐवजी एक वही-एक पेन हे त्यांचे आवाहन अनाथलयातील मुलांसाठी वीस डझन वह्या, पेन मिळवून देणारे ठरले. आता यावर्षी त्यांनी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी आवाहन केलंय.
मुदिता-सुदिनी-रुणाली आणि राजेश जी. गाडे यांच्या आवाहनाला गणेशभक्त यावेळीही प्रतिसाद देतील, यात शंकाच नाही.