मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे. कुंटे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे असून मुंबईचे महापालिका आयुक्तही होते. सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सिताराम कुंटे यांनी मुंबई मनपात उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त अशा तीन पातळ्यांवरील पदांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चांगलं नातं आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मानले जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस यांना कुंटे हे मुख्य सचिव व्हावे अशी इच्छा होती पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुंटे यांच्या नियुक्तीच्या बाजूने नव्हते.
नवे मुख्य सचिव सिताराम कुंटेंचा अजेंडा
- कोरोनाशी सामना करणे
- राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे
- मोठे प्रकल्पांची अंमलबजावणी
१९८६ बॅचचे आयएएस अधिकारी मनु कुमार श्रीवास्तव यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रमुख आरए राजीव यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
सध्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांची इच्छा महारेरावर नियुक्तीची होती, पण तेथे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी नुकतीच अजोय मेहता यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे संजय कुमारांना आनंद कुलकर्णींच्या कार्यकाळानंतर रिकाम्या झालेल्या वीज नियामक आयोगाशिवाय पर्याय नाही.