मुक्तपीठ टीम
केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या जन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत स्वच्छता पंधरवड्याचा समारोपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. जन शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या गोव्यातील महिलांनी सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवण्यासही सुरुवात झाली.
देशप्रेमाचे प्रतीक म्हणून जन शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या युवती आणि महिलांनी जवानांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी संस्थेचे कौतुक केले. जन शिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे दालन खुले करते. अशा संस्थांमधूनच व्यवहारज्ञान प्राप्त होते, असे नाईक म्हणाले.
गोव्याच्या संस्थेतील युवती आणि महिलांनी तयार केलेल्या ५ हजार राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवण्यात येणार आहेत. गोवा, महाराष्ट्र आणि दीव दमण येथील जन शिक्षण संस्थांकडून एकूण ७५ हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत.
जन शिक्षण संस्था महिलांना समाजात वावरण्यासाठी आत्मविश्वास प्रदान करते. संस्थेने अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवून मार्गक्रमण करावे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. जन शिक्षण संस्थेने स्किल इंडिया स्वच्छता पंधरवड्याचे १५-३१ जुलै दरम्यान आयोजन केले होते, त्याचाही आज समारोप करण्यात आला.