मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट उसळली असतानाच भारतात लसीचा तुटवडा जाणवत आहे. भारतातील कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर आता स्पुटनिक-व्ही आणखी एक लस पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. सध्या उपलब्ध असणाऱ्या या तीनही लसींचे दोन डोस घ्यावे लागतात. त्याचवेळी जॉन्सन अँड जॉन्सनप्रमाणेच रशियाच्य स्पुटनिक व्ही – लाइट या लसी सिंगल डोस म्हणून उपलब्ध होणार आहेत. त्यातील सिंगल डोसवाली स्पुटनिक लाइट लस लवकरच भारतातही उपलब्ध होणार आहे.
स्पुटनिक लाइट ही सिंगल डोस लस लवकरच भारतात
भारतातील रशियन राजदूत एन. कुदाशेव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, स्पुटनिक व्ही या लसीचे भारतातही उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. भारतात त्याचे उत्पादन हळूहळू दरवर्षी ८५ कोटी डोसपर्यंत वाढवण्यात येईल. लवकरच भारतात स्पुतनिक लस ही सिंगल डोस लस देण्यात येईल. एन. कुदाशेव यांनी असे म्हटले आहे की, “स्पुतनिक व्हीचा कोरोना रोखण्यातील प्रभाव आता मान्य केला गेला आहे. २०२०च्या उत्तरार्धानंतर रशियामध्ये सुरू झालेल्या व्यापक लसीकरणात स्पुटनिकचा यशस्वीरित्या उपयोग केला जात आहे. ते म्हणाले की, रशियन तज्ज्ञांनी जाहीर केले आहे की ही लस नवीन कोरोना व्हॅरियंटच्या संसर्गातही प्रभावी ठरेल.
सिंगल डोसवाली स्पुटनिक व्ही लाइट व्हर्जन
- स्पुटनिक व्हीचे लाइट व्हर्जन एका डोसमध्ये कोरोना विषाणूशी लढण्याची क्षमता देईल.
- स्पुटनिक व्हीचा लाइट व्हर्जन ही सिंगल डोस कोरोना लस आहे, जी ८०% प्रभावी आहे.
- दोन डोस असलेल्या लसींपेक्षा स्पुतनिकचे लाइट व्हर्जन एकाच डोसमध्ये अधिक प्रभावी आहे.
- स्पुटनिकच्या या लाइट व्हर्जनच्या लसीलाही रशियन सरकारची मान्यता मिळाली आहे.
स्पुटनिक जगातील सर्वात पहिली आणि प्रभावी लस
- स्पुटनिक व्ही ही लस जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे.
- सुरुवातीला स्पुतनिक व्हीच्या क्षमतेवर शंका निर्माण झाली, परंतु नंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा चाचणीचा डेटा द लॅंसेटमध्ये प्रकाशित झाला तेव्हा लस सुरक्षित आणि प्रभावी म्हणून आढळली.
- कोरोनावरील रशियन लस ‘स्पुटनिक-व्ही’च्या तिसर्या टप्प्यातील चाचणीत ती ९१.६ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
- या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.
- ‘द लॅंसेट’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेटाच्या अंतिम विश्लेषणामध्ये हा दावा केला गेला आहे.
- रशियन कोरोना लसीच्या ‘स्पुतनिक व्ही’ च्या आपत्कालीन वापरास भारतात मान्यता देण्यात आली आहे.