प्रा.शुध्दोधन कांबळे
विद्यार्थ्यांनी रास्त कारणासाठी रस्त्यावर जरुर उतरावे पण चुकीच्या मागणीसाठी “भाईगीरी” करु नये. ऑनलाईनमध्ये पास होण्याची गॅरंटी असल्यामुळे हे रस्त्यावर आले, अभ्यासू विद्यार्थ्यांना आॕनलाईन किंवा आॕफलाईनची भीतीच नसावी. आजचा काळ परफाॕरमन्स सिध्द करण्याचा आहे, ९९ टक्के घेऊन गुणवत्ता नसेल तर त्याला काही अर्थ नाही. मागील दोन वर्षापासून सगळ्यात जास्त शिक्षणक्षेत्र अफेकटेड झाले आहे, आता कुठे हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात आॕनलाईन शिक्षण हा फक्त एक पर्याय बनला आहे पण हा परमनंट उपाय नाही.
ज्या सोशल मीडियातून आंदोलन पसरले त्याच सोशल मीडियात ऑनलाईन शिक्षणाची मजाक उडविणारे मीम्स पाहिले की विद्यार्थ्यांनीच स्वत: शाळा उघडण्यासाठी असे आंदोलन करायला पाहिजे होते पण तसे झाले नाही उलट आॕफलाईन परीक्षा घ्या म्हणून आग्रह केला जातोय. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी एक कारण असे सांगितले जात आहे की, आॕनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय राहिली नाही. हे म्हणजे सैनिकांनी शस्त्र चालविणे विसरून गेल्या सारखे आहे. कोरोनाचे नियम पाळून आॕफलाईन परीक्षा शक्य असेल तर ती झालीच पाहिजे यासाठी विद्यार्थी आणि पालक सकारात्मक असले पाहिजे. हा कुठलाही राजकीय मुद्दा नसून भविष्य तयार करणारी प्रक्रिया आहे.
शिक्षण हे राजकीय व धार्मिक बाबींपासून दूर असले पाहिजे. मार्कशीट हा गुणवत्ता दाखविणारा कागद नाही , गुणवत्ता सिध्द करावी लागते. “पास होने के लिए नही काबील होने के लिए पढो!” या थ्री इडीयट चित्रपटातील संवादानुसार सर्व विद्यार्थ्यांनी पात्रता मिळविण्यासाठी अभ्यास केला पाहिजे नाही तर आपल्या देशात पी.एच. डी. सारखी सर्वात मोठी डिग्री पण मॅनेज करुन मिळविता येते. शिक्षणाचा उदेश हा आपण शिकत असलेल्या विषयात सर्वोत्तम ज्ञान मिळविणे आहे. हे ज्ञान आॕफलाईन मिळो का आॕनलाईन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आवश्यक आहे. परीक्षा आॕनलाईन झाली तर आपण चांगल्या गुणांनी पास होऊ असा संकुचित विचार विद्यार्थ्यांनी करण्यापेक्षा आयुष्यातील हे एक महत्त्वाचे वर्षे असून अभ्यास आणि मेहनतीने हे वर्षे आयुष्याला कलाटणी देईल आसा व्यापक विचार करावा.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)