मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोनाची भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शुटिंग बंद असल्याचा फायदा घेऊन बॉलिवूडचे अनेक कलाकार सुट्टीवर जाताना दिसत आहेत. कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. कधी एका कलाकाराचे फोटो व्हायरल होत आहेत, तर कोणाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशा कलाकारांना अभिनेत्री श्रुती हसनने खडे बोल सुनावले असून नाराजी व्यक्त केली आहे.
कलाकारांचे असंवेदनशील वर्तन
श्रुती हसनने क्विंट या माध्यमाशी बोलताना वाढत्या कोरोना महामारीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच बॉलिवुडचे कलाकार या तणावाच्या काळात सुट्टीवर जात असल्याबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे. श्रुती म्हणाली की, “मला कोणावर टीका करायची नाही आहे. पण संपूर्ण देशात महामारी सद्रुश्य परिस्थिती असताना कलाकार सुट्टीवर जाणे हे असंवेदनशील वर्तन आहे, असे मला वाटते”.
संकटकाळात मौजमजा का दाखवता?
“कलाकार मनमोकळा आनंद मिळवण्यासाठी सुट्टीवर जात आहेत. पण मला वैयक्तिकदृष्ट्या असे वाटते की, हा सर्वांसाठी अवघड काळ आहे, काही लोकांसाठी तर खूपच. आपल्याला मिळालेल्या चांगल्या सोयी -सुविधांसाठी कृतज्ञ असले पाहिजेच, पण कलाकारांनी लोकांसमोर आपल्या सुविधांचे दर्शन घडवायला नकोत”, असे श्रुती हसने कलाकरांना सल्ला दिला आहे.
श्रुती काळजी घ्यायची, इतर वेड्यात काढायचे!
श्रुती हसन पुढे म्हणाली की, “महामारी विषयी मी जेव्हा जेव्हा चिंता व्यक्त केली तेव्हा सर्वांनी मला वेड्यात काढले. पहिल्या लॉकडाऊननंतर सर्व स्थिरावत होते. पण तेव्हाही मी काळजी घेत असे पण तेही काही लोकांना आवडत नव्हते”.