मुक्तपीठ टीम
विद्यार्थ्यांना घडविण्याचा शंभर वर्षांचा जाज्वल्य वारसा, नावलौकिक दर्शवीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) बालशिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना शाळेची शताब्दीपूर्ती निमित्त भव्य शोभायात्रा निघाली. भांडारकर रस्त्यावरील बालशिक्षण शाळा, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, आर्यभूषण प्रेस, बीएमसीसी रस्ता, भांडारकर रस्त्याने पुन्हा शाळेत अशी ही शोभायात्रा निघाली. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शोभायात्रेच्या मार्गात अंशतः बदल करण्यात आला.
या शोभायात्रेत ‘मएसो’चे अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष आनंदी पाटील, क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक कानडे, डॉ. आनंद लेले, मएसो सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव इंजि. सुधीर गाडे,शाळेचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन, प्रा. चित्रा नगरकर, प्रा. सुधीर भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, शिशु विभागच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके यांच्यासह, पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी,शिक्षक ,पालक, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक व माजी शिक्षक शोभायात्रेत सहभागी झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध महापुरुष, शेतकरी, लष्करी जवान,उद्योगपती,नौदल अधिकारी, वायुसेना अधिकारी, वकील, पत्रकार, नामवंत कलाकार, खेळाडू, राजकारणी यांच्या प्रतीकात्मक वेशभूषेत सहभागी झालेला व मएसोच्या संस्थापकांच्या प्रतिमा विराजमान असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शोभायात्रेच्या अग्रभागी असलेल्या गरवारे प्रशालेचे टिपरी, ध्वज व ढोल पथकाने आकर्षक व जोशपूर्ण सादरीकरण केले.