मुक्तपीठ टीम
बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीत शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच ८ जागांवर विजय मिळवला आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे आमदार योगेश कदम पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
काय म्हणाले आमदार योगेश कदम?
- माझं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी करायची असेल तर ज्याची ताकद आज असेल तशाप्रमाणे जागावाटप झालं पाहिजे, तसं असतं तर मला महाविकास आघाडी मान्य होती पण तसं झालं नाही.
- शिवसेनेचं खच्चीकरण करायचं राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती.
- ही नीती दुर्दैवाने दापोलीत झाली.
- आता घडलं काय, की ५ वर्षे ज्या शिवसेनेची सत्ता दापोली नगरपंचायतीकडे होती त्या शिवसेनेकडे सत्ता नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे.
- फायदा कुणाचा झाला आहे तर राष्ट्रवादीचा झाला आहे.
- रामदास भाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो, प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही.
- मंडणगडमध्ये जे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते ८ जण निवडून आले.
- मंडणगडध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल हा विश्वास आहे.
दापोली नगरपंचायतीचे निकाल जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून १७ पैकी १४ ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत.