तुळशीदास भोईटे/सरळस्पष्ट
“करता रहा सो क्यों रहा,अब करी क्यों पछताय ।
बोया पेड़ बबुल का, अमुआ कहा से पाये ।।”
सध्या उत्तरेतील धार्मिक रचनांना महाराष्ट्रात चांगले दिवस आहेत. मारुती स्तोत्रापेक्षाही तुलसीदासांच्या हनुमान चालिसाचा प्रचार मराठीअभिमानी असणारे नेते करताना दिसत आहेत. त्यामुळे मलाही उत्तरेतील संत कबिरांच्या वरील ओळी आठवल्या. त्यांचा अर्थ साधा सोपा आहे, मराठीत आपण म्हणतो,” जे पेरावं तेच उगवतं!”
पश्चातापाला अर्थ नसतो!
संत कबीर दास म्हणतात की जेव्हा तुम्ही वाईट कृत्ये करत असता तेव्हा संतांनी सांगूनही तुम्हाला समजत नव्हतं. मग आता तुम्ही का पश्चात्ताप करत आहात? तुम्ही जर काटेरी बाभूळचं झाड लावलं असेल तर आंबे कुठून येतील?
खासदार नवनीत राणा यांचे नवनवे अवतार पाहून त्यांना आपल्या पक्षांचे उमेदवार न देता अपक्ष लढण्यासाठी पाठिंबा देत बळ उभे करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी संत कबिरांची ही रचना खूप सांगणारी.
ते असो. कारण राजकारण्यांनाच नाही तर सामान्य मतदारांनाही अनेकदा तसं वाटतं. पण पश्चातापाला अर्थ नसतो. तो पाठून केलेलाच ताप असतो.
सोयीनं राजकारण!
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी गेले काही दिवस रोज नवे विषय आणि रोज नवे वाद उभे करून राज्यातील आघाडी सरकारला ताप देणं सुरु केलं आहे. ते राजकीय नेते आहेत. सोयीनं राजकारण करणं यात गैर नाही. पण गैर आहे ते सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा धोका पत्करत त्यांनी तसे करणे. वर्दळीच्या उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करुण्यावरून वाढलेलं तापमान कमी होण्याआधीच त्यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा छेडला. तोही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचं पठन करण्याचं त्यांनी जाहीर केलं.
कोरोनानंतर दंगल परवडणार नाही!
खरंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात तसे हनुमान चालिसा भारतात नाही वाचायची तर काय पाकिस्तानात वाचायची का? असा जर विचार केला तर त्यात काहीच गैर नाही. पण कोरोनातून मुंबई महाराष्ट्रच नाही तर देश सावरत असताना आता तरी आपले जनजीवन विस्कळीत होईल, असं काहीही करणं कुणालाही परवडणारं नाही. कोरोनाने आपल्याला दोन वर्षे मागे फेकले आहे. आता जर अशा राजकीय चाळ्यांमुळे दंगल पेटली तर आपण काही वर्षे मागे जावू. आर्थिक राजधानी मुंबई पेटणे देशालाही परवडणारे नाही. कोणी कितीही आव आणला तरी मुंबईचं एक वेगळं महत्व आहे. राजधानी दिल्ली काहीसी धुमसत असतानाच आर्थिक राजधानीतही तणाव पसरवणे योग्य नाही.
राऊत-सरदेसाईंनी संयमाने शिवसेनेच्या शक्तीची शोभा वाढवली!
अर्थात राजकारण्यांना एवढी दीर्घदृष्टीने विचार करण्याची सवय नसते. त्यामुळे राण दंपती मुंबईत धडकले. पण त्यानंतर त्यांना राजकारणातील वास्तव कळलं. अमरावतीत पदाचा वापर करत टीव्ही कॅमेऱ्यांसमोर प्रतिमा निर्मिती करणे सोपे असते पण मुंबईत त्यांच्या आगाऊपणामुळे संतापलेल्या शिवसैनिकांना तोंड देणं तसं सोपं नव्हतंच नव्हतं. शिवसैनिकांनी राणांच्या घरालाच वेढा दिला. पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना बाहेर जावू दिलं नाही. अखेर मातोश्रीला जायला निघालेले राणा तुरुंगात पोहचले. तेथे पोहचतनाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख XXX असा अर्वाच्च शब्दात केला. दोघांनीही केला. मुक्तपीठनंच सर्वप्रथम ते उघडकीस आणलं.आता गुन्हे दाखल होत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत आणि युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांचे नेतृत्व करत आक्रमकतेने पण संयम न सोडत राणांचे मनसुबे अखेर यशस्वी होवू दिले नाहीत. तसा विचार केला तर राणांना घरातच कोंडून ठेवणे न पटणारेच. पण शांतपणे विचार केला तर दुसऱ्यांच्या घराबाहेर जबरदस्तीने हनुमान चालिसा वाचणेही मग गैरच होते. अशा ठकांना महाठकच मिळतात. अखेर राणांना मातोश्री तर नाही पण रात्री खार पोलीस ठाणे आणि आज तुरुंगही दिसला. सगळीकडे शिवसेनेच्या नावाची चर्चा झाली. विनायक राऊत, वरुण सरदेसाई हिरो ठरले. शेवटी शक्ती ही संयमानेच शोभते!
एका दगडानं घात केला…
पण संध्याकाळीच खरं तर नको ते घडण्याची शंका व्यक्त होवू लागली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रात्री राणा दांपत्याला पोलीस ठाण्यात भेटायला जाण्याची घोषणा केली. ते गेले आणि पतताना त्यांच्या गाडीवर आधी बाटल्या आणि नंतर एकही दगडही भिरकावला गेला. त्यात काच फुटली, मलाही लागलं असा आरोप करत सोमय्यांनी रात्री उशीरापर्यंत शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
राणांमध्ये कमावले, सोमय्यांमध्ये गमावले!
शिवसेनेने आक्रमक असावं. नक्कीच असावं. पण सत्तेत आहोत, याचा विसर पडू न देता. खासदार विनायक राऊत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि युवा नेते वरुण सरदेसाई यांनी संयमानं शिवसेनेच्या शक्तीची शोभा वाढवली. मात्र, रात्री एका दगडाने घात केला. एक दगड फेकला आणि गालबोट लागलं. सोमय्या म्हणतात, ते योग्यच कुणाला, किती लागलं ते नाही दगड गाडीवर फेकला हे महत्वाचं. तसं घडता कामा नये होतं. त्यामुळे शिवसेना हिरोच्या भूमिकेतून थेट आरोपीच्या पिंजऱ्यात पोहचली. शिवसेनेने राणांविरोधात जे कमवले ते केवळ सोमय्यांच्या गाडीवरील एका दगडामुळे गमावले. तसे झाले नाही पाहिजे होतं. भविष्यात तरी अशा चुका घडता कामा नये. कारण तसं घडण्यातूनच बरंच काही बिघडू शकतं.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)