मुक्तपीठ टीम
मीरा भाईंदर मधील शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. शिवसेनेला संपवण्याची भाषा व ठाकरे घरण्यासह शिवसेनेचे संस्कार काढणाऱ्या, त्रास देणाऱ्या माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाईचा आग्रह नगरसेवकांनी धरला. त्यावर लेखी तक्रारी घेऊन कारवाई करू, असे आश्वासन शिंदें यांनी दिले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, नगरसेवक जयंतीलाल पाटील, राजू भोईर, दिनेश नलावडे, कमलेश भोईर, शर्मिला बगाजी, एलायस बांड्या आदींसह अन्य नगरसेवक, पदाधिकारी हे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेटण्यास गेले होते. सुमारे दोन – अडीच तासांच्या प्रतिक्षेनंतर शिंदेंनी सर्वाना बोलावून घेतले.
मीरा भाईंदर महापालिकेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. अपक्ष आमदार गीता जैन ह्या शिवसेने सोबत असल्या तरी दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे ईडीच्या जाळ्यात गुंतले असल्याने ते गेले काही महिने शहरात आलेले नाहीत.
त्यातच राज्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना व शिवसेनेशी युती असताना सुद्धा तत्कालीन भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. बाळासाहेबांच्या कलादालनाच्या कामास विरोध केला. मेट्रो, वरसावे पूल, घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण, न्यायालय आदी काम ही सेनेच्या प्रयत्नांमुळे होत असताना त्याचे श्रेय स्वतःला मिळावे म्हणून राजकीय अडथळे आणले जातात.
दबाव आणून नगरसेवक – पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला लावतात. बांधकाम तोडायला लावले, पालिकेत नगरसेवकांच्या निधी व कामात अडथळे आणले गेले. शिवसेना व ठाकरे घराण्याचे संस्कार काढले व शिवसेना संपवण्याची भाषा केल्याचे पाढे शिंदे यांच्या बंगल्यावर वाचण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मेहतांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांचा ७११ क्लब वादग्रस्त व नियमबाह्य आहेत. आपना घर योजनेत गैरप्रकार आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहतांची चौकशी चालवली, टीडीआर – जमीन खरेदी च्या तक्रारी आहेत तरी सुद्धा आपलं सरकार असून ही कारवाई होत नसल्याने नागरिक आम्हाला विचारणा करत असल्याची व्यथा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मांडली.
इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच नगरसेवक, पदाधिकारी भेटून त्यांच्या व्यथा मांडत असल्याने आपले नेते व मंत्री ठोस आश्वासन देऊन अधिकाऱ्यांना कार्यवाही साठी सांगतील अशी अपेक्षा होती. शिंदे यांनी लेखी तक्रारी आणून द्या, त्या पाहून कार्यवाही करू. मेहता जर त्रास देत असेल तर फोन करू का असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्याने सुद्धा या भेटीला दुजोरा दिला.
दुसरीकडे मेहता हे शिंदेच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा होत असल्याने राज्यात सत्ता येऊन सुद्धा अजून शिवसैनिकांच्या व्यथांची दखल घेतली जाणार नसेल तर न्याय मागायचा तरी कोणा कडे? अशी खंत एका नगरसेवकाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.