मुक्तपीठ टीम
भाजपाचे नगरसेवक मिहीर कोटेचा यांनी शिवसेनेवर सफाई कामगारांच्या घरांमध्ये ५००कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबई मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे देशभरात ऑपरेशन लोटस करून दुसरे पक्ष फोडत आपला पक्ष वाढवणाऱ्या भाजपातच फोडाफोड करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उघड होते आहे. भाजपामधील नगरसेवक भाजपच्या पालिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे कंटाळले आहेत. अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपले नगरसेवक फुटण्याच्या धसक्याने भाजपा शिवसेनेवर बेछूट आरोपांच्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा खटाटोप सुरू केला असल्याची टीका केली.
डिसेंबरमध्ये भाजपाला खिंडार?
- एकीकडे आघाडीमध्ये चालू असलेल्या डावपेचामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते, नेतेमंडळी शिवसेनेतून भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत.
- तर दुसरीकडे अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असा दावाही जाधव यांनी केला.
राज्यातही आमदार फोडण्याचे प्रयत्न?
एकीकडे मुंबईतील भाजपा नगरसेवक फुटणार असल्याचा दावा शिवसेनेच्या यशवंत जाधव यांनी केला असताना दुसरीकडे राज्यभरातील काही भाजपा आमदारांना हेरून फोडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील पक्षांकडून केला जात असल्याचीही चर्चा आहे. विशेषत: महाविकास आघाडीतून सत्तेच्या मोहाने पक्षांतर केलेल्यांपैकी काहींचा आता आघाडीच्या सत्तेला दोन वर्षे होत आले तरी सत्तांतर होत नसल्याने धीर सुटला आहे. अशांना हेरून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आघाडीकडून सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या केंद्रीय यंत्रणांविरोधातील आक्रमक भूमिकेमुळेही त्या भीतीची तीव्रता कमी होऊ लागल्याचे मानले जाते. त्याचाही या उलट्या ऑपरेशन लोटसमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
आमदारांचे राजीनामे घेऊन त्यांना आघाडीचे सर्वमान्य उमेदवार म्हणून निवडून आणायची रणनीती सांगितली जात असली तरी पंढरपूरमधील आघाडीतर्फे लढलेल्या राष्ट्रवादी उमेदवाराच्या पराभवानंतर ती रणनीती १०० टक्के यशस्वी ठरेलच असे नाही. त्यामुळे जिथे विजयाची शक्यता जास्त, तिथंच असे उलटे ऑपरेशन लोटस शक्य असल्याचे सांगितले जाते.
यशवंत जाधवांनी गौप्यस्फोट केला त्या मूळ प्रकरणाविषयी…
भाजपाचे नगरसेवक-नेते मूग गिळून गप्प का बसले होते?
- मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
- त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहे
भाजपाचे नगरसेवक गप्प का बसले?
- प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे.
- विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपाचे नगरसेवक-नेते मूग गिळून गप्प का बसले होते?
- भाजपाने ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा.
- आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जात आहे.
शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला!
- शिवसेनेमुळे सफाई कामगारांना ४००६ घरे मिळणार सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
- अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
- यामध्ये मुंबई शहरात११२१, पश्चिम उपनगरात १४९९ आणि पूर्व उपनगरात
- १३८६ अशी एकूण ४००६ घरे बांधली जाणार आहेत.
- याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
- त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.
“मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार”