#प्रेरणा शिवाजी चौगुले – सरकारी सेवेतील मीठ रांगोळीचा कलाविष्कार!
चिमूटभर मीठ जेवणाला चव आणतं. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागतं. हे मीठ केवळ जेवणाचीच चव वाढवतं असं नाही तर एका प्रतिभाशाली कलाकाराच्या हाती जातं तेव्हा हे असामान्य कलाविष्कार घडवतं. एकापेक्षा एक सरस सामाजिक व आरोग्य विषयक संदेश समाजात पसरू लागतात. आपल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी विठ्ठल चौगुले यांनी ही किमया साधली आहे.
-
माधुरी सुखटणकर/मुक्तपीठ
शिवाजी चौगुले यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. बालपणीची ही आवड पुढे आपल्याला नावलौकिक मिळवून देईल असं त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे ही आवड पूर्ण ताकतीने जोपासता येत नव्हती. त्यांना चित्रकलेचा कोर्स करता येत नव्हता आणि चित्रकलेची आवड त्यांना स्वस्थही बसू देत नव्हती. त्यामुळे या कलेच्या ओढीने ते मुंबईच्या सर जे.जे. कला महाविद्यालयात घुटमळू लागले. अजूनही जेव्हा सुट्टी असेल, तेव्हा आवर्जून या कला मंदिराला सुट्टीच्या दिवशी भेट देतात.
पुढे सार्वजनिक आरोग्य विभागात रुजू झाले. सध्या उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजमध्ये ते प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत. कोणतीही व्यक्ती एकदा का नोकरी-धंद्याला लागली की तिच्या व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदारी वाढतात. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्याऐवजी अर्थाजनाच्या, कुटुंबीयांच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. पण कोणताही कलाकार त्या मर्यादेत कोंडून घेणारा नसतो. तो स्वतःला अभिव्यक्त करण्यासठी माध्यम शोधत असतो.
घरी, कार्यालय, लग्न समारोह असला की छोटीशी का होईना रांगोळी काढली जाते तसा हा प्रांत महिलांचा असला तरी शिवाजी सारखे कलाकार मागे नाहीत, शिवाजी यांनी रांगोळीत रस घेतला त्यांनी रंगासोबत जाड्या मिठाच्या खड्यांचा वापर केला, त्यांची ही कला आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांना भावली त्यांनी शिवाजी यांना प्रोत्साहन दिले. कौतुकाच्या थापेमुळे शिवाजी यांना जोम आला, केवळ कलात्मक रांगोळी काढणं हा शिवाजी यांचा हेतू नव्हता तसेच आपल्या कलेतून लोकांना आनंद तर मिळालाच पाहिजे पण, तो क्षणिक न राहता त्यातून काहीतरी सामाजिक संदेश जनमाणसांमध्ये जतला गेला पाहीजे हा व्यापक हेतू होता. त्यातून स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा, आरोग्य दिवस असे मिठाच्या रंगोळीतून, लोकांसमोर एकापेक्षा एक आरोग्याचे सामाजिक संदेश फिरू लागले. “भविष्यातही मी माझ्या रांगोळीतून आरोग्य विभागाची जनजागृती करणार आहे. माझी कला केवळ खात्यापुरतीच मर्यादित राहणार नाही, इतर लोकांच्या नजरेलाही भावत आहे, असे शिवाजी चौगुले यांनी सांगितले.
कलेतून जनजागरणाचे शिवाजी चौगुलेंचे कार्य कोरोना काळातही सुरुच राहिले. १६ जानेवारीपासून भारतभर कोविड योद्ध्यांना कोरोना लसीकरण सुरु झाले. या विषयाला अनुसरून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे त्यांनी १०० किलो जाडे मीठ, १० किलो रंग वापरत महारांगोळी काढली. तब्बल ९ तास लागले. पण त्या रांगोळीचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी करून सत्कारही केला. उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही रांगोळीचे तोंड भरून कौतुक केले.
पुढचे संकल्प
मुक्तपीठशी बोलताना शिवाजी चौगुले यांनी आपलं मन मोकळं केलं, “मी आरोग्य विभागात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे शिपाई या पदावर नियुक्त आहे. सध्या मी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज ,कोल्हापूर येथे डेप्युटेशनवर कार्यालयीन शिपाई म्हणून कार्यरत आहे. आरोग्य विभागाने माझ्या जाड्या मिठाच्या रांगोळीचे कौतुक पुरस्कार देऊन वेळोवेळी केले आहे. विविध पुरस्कारही मिळाले आहेत. ही कला साकारण्यासाठी मी कोणताही कोर्स केला नाही, विशेष! मी आरोग्यविषक जनजागृती करण्याचा मानस आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रमातून माझी कला लोकांपर्यत सादर करण्याचा मानस आहे. सध्या लिम्का बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्नशील आहे. आरोग्य विभाग आजी माजी संचालक, आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग यांची साथ मला वेळोवेळी लाभते. त्याचबरोबर पत्नी प्रियांकाची अमूल्य साथ लाभत असते. मी गरीब व गरजू मुलांसाठी विनामूल्य क्लासेस माझा मुलगा डॉ. रियांश याच्या नावाने सुरू करणार आहे.”
रांगोळीकार शिवाजी विठ्ठल चौगुले यांचा सन्मान:
- जागतिक एड्स दिन निमित्त १ डिसेंबर २०१८ रोजी माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडून गौरवण्यात आले.
- २८ नोव्हेंबर २०२० रोजी कोरोना योद्धा म्हणून खासदार संजय मंडलिक यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
- १५ ऑगस्ट २०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय कडून सन्मानित करण्यात आले.
- १ नॉहेंबर २०२० रोजी कोरोना योद्धा म्हणून राजे समरजितसिंह यांच्याकडून गौरवण्यात आले.
- २६ जानेवारी २०१७ रोजी डॉ. सतीश पवार, आरोग्य सेवेचे संचालक यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
- मा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडून जागतिक टीबी डे २४ मार्च २०१५ रोजी गोल्ड मेडल आणि सत्कार करण्यात आला.