मुक्तपीठ टीम
दुबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सलग ७ व्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
प्रत्येक वर्षी शिवजयंतीसाठी इतिहास संशोधक, लेखक, शिवव्याख्याते यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना आयोजक आणि उपथितांच्यावतीने श्रद्धांजली देण्यात आली. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात बाल मावळ्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. विक्रम भोसले यांनी दिलेली शिव-शंभू गारद याने वातावरण शिव-रोमांचित झाले.
प्राध्यापक नितीन बानुगडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व मुद्देसूद मांडणीतून छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्यातून काय शिकायला हवे, या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्राध्यापक नितीन बानुगडे यांनी आपल्या व्याख्यानातून चाकणच्या भुईकोट किल्यावर स्वराज्यातील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी ३०० ते ३५० मावळ्यांसह अतिशय ताकदीने कसा लढा दिला होता हे सांगितले. किल्ला हातचा गेल्यानंतर ही शिवरायांनी या किल्लेदारांचे मनोबल कसे वाढविले होते. स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूंच्या सैन्याच्या तुलनेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य हे नेहमीच नगण्य असायचं परंतु काटेकोर नियोजन, बुद्धिमत्तेचा सदुपयोग व अथक मेहनत या गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी नेहमी शत्रूला फत्तेशिकस्त दिली. शिवराय हे सर्व धर्मांचा आदर करायचे, लढाई दरम्यान एखादी कुराणाची प्रत सापडली तर ती शत्रूच्या पदरी असलेल्या मुस्लिम शिपायाला सन्मानाने परत द्यायचे या विषयी सांगितले.
पुढे आपल्या व्याख्यानातून नितीन बानुगडे यांनी सांगितले, ज्वलंत इतिहास उभा करताना शत्रू पक्षातील स्रियांना सुद्धा संरक्षण देणारे शिवराय, पराभूत झालेल्या सैन्याला व सेनापतीला आदराची वागणूक देणारे शिवराय, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी आपल्या सैन्याला सक्त ताकीद देणारे शिवराय, प्रतापगडावर अफजल खानाच्या एक दिवसाच्या भेटीसाठी कित्येक दिवस काटेकोर नियोजन करून त्यावर अंमल करणारे शिवराय, शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे स्वतःच्या कृतीतून सिद्ध करणारे शिवराय इत्यादी विषयांवर सखोल प्रतिपादन करून ऑनलाईन उपस्थितांची मने जिंकली.
या शिवजयंती निमित्त आयोजकांनी शिवराय आणि त्यांच्या इतिहासाच्या निगडीत व्हिडीओ स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धकांमध्ये भारतातून, संयुक्त अरब अमिरातीतून आणि इतर देशातून उत्सुर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्यांना क्रमशः रुपये १०,०००; ५०००; ३००० अशी पारितोषिके देण्यात आली.
यावर्षी आयोजकानीं संयुक्त अरब अमिरातीमधील शिवप्रेमींना घरपोच ग्रंथभेट देण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुकांनी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोरोना महामारी पासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक शासनाचे नियम पालनाचे आवाहन करून महाराष्ट्र राज्यातील पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा उल्लेख मावळे असा करत, महामारी दरम्यान त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची प्रशंसा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदाताई सपकाळे आणि अमोल कोचळे यांनी केले. साईनाथ मांजरे यांनी सत्यशोधक प्रवास आणि महापुरुषांची ओळख करून दिली. अभिजीत देशमुख यांनी आभार मानले. ऑनलाईन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाजू आशिष जीवने, विजयसिंह शिंदे यांनी उत्तमरीत्या सांभाळली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामेश्वर कोहकड़े, विक्रम भोसले, निखिल गणूचे, अभिजीत देसाई, जयंत रंगारी, पंकज आवटे, संतोष सपकाळे, संदीप कड, ओंकार देशमुख, साजिद शेख, ज्ञानेश्वर जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.