मुक्तपीठ टीम
पालघर हा ठाणे जिल्ह्याचाच पूर्वी भाग होता. त्यामुळे तो शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हेही शिंदे गटात गेलेत. पण तरीही पालघर नगरपरिषदेत शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का दिला असून पाच विषय समित्यांच्या सभापतिपदी शिवसेनेचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एका समितीसाठी मतदान झाले असले तरी ते सभापतिपदही बहुमताने शिवसेनेकडे आले. स्थायी समितीवरही शिवसेनेच्या नगरसेवकांचा बोलबाला राहिला.
2019 मध्ये पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपने ही निवडणूक संयुक्तरीता लढवली होती त्यानंतर भाजपला प्रत्येक वेळेस एक सभापती पद शिवसेनेमार्फत दिले जात होते. मात्र विषय समिती सभापतीसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपचा धुवा उडवत सहा ही सहा विषय समिती सभापती पद आपल्याकडे राखून ठेवले त्यामुळे पालघर नगर परिषदेवर आता शिवसेनेची निर्विवाद सत्ता आली आहे.
पालघर नगर परिषदेच्या पाच विषय समित्यांसाठी शिवसेनेच्या नगरसेवक व नगरसेविकांनी अर्ज दाखल केले होते मात्र त्यांच्यासमोर कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे पाच विषय समित्यांवर शिवसेनेच्या नगरसेवक नगरसेविकांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. नियोजन व विकास समितीसाठी भाजपच्या एका नगरसेविकेने शिवसेनेच्या समोर अर्ज दाखल केला होता मात्र भाजपाला आपले बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे मतदान द्वारे शिवसेनेने बहुमत सिद्ध करत हे सभापती पद हे आपल्या पारड्यात घेतले. या निवडणुकीत शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे यांची भूमिका महत्त्वाची ठरली त्यांनी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या नगरसेवक व नगरसेविका यांना एकत्रित आणून सर्व समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी काम पाहिले. यावेळी शिवसेना जिल्हा पालघर संपर्कप्रमुख केतन पाटील, शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास मोरे, शिवसेना शहर प्रमुख भूषण संखे आदींनी नवनियुक्त सभापतींची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी नगरसेवक रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील, अक्षय संखे आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्ष उज्ज्वला काळे,
◆ सार्वजनिक बांधकाम समिती – राजेंद्र आत्माराम पाटील
◆ पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – उपनगराध्यक्ष उत्तम मोरेश्वर घरत
◆ स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती – तुषार दिलीप भानुषाली
◆नियोजन व विकास समिती – अमोल प्रकाश पाटील
◆ महिला व बालकल्याण समिती – अनुजा अशोक तरे
◆ शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती- चंद्रशेखर गोपीनाथ वडे
◆ स्थायी समिती सदस्य – कैलास म्हात्रे, सुभाष पाटील, लक्ष्मीदेवी हजारी(भाजप)
पालघर शिवसेनेसोबतच! – कैलास म्हात्रे
पालघर नागरपरिषदेतील सर्व शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक आहेत. नगरपरिषदेवर पूर्वापार शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे. आताही आहे व भविष्यातही तो फडकत राहण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. एकनिष्ठेमुळे आज पुन्हा एकदा सहा समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले आहे, अशी प्रतिक्रिया पालघर नगर परिषदेतील शिवसेना गटनेते कैलास म्हात्रे यांनी दिली.