मुक्तपीठ टीम
येत्या १४ तारखेला होणाऱ्या सभेत मी काहीजणांचे मास्क काढणार, असा इशारा मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ७ मे रोजी दिला होता. आज मुंबईतील बीकेसी मैदानावरील जाहीर सभेत ते कुणा-कुणाच्या चेहऱ्यावरील मास्क काढणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे ही सभा मोठी व्हावी यासाठी शिवसेनेने नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. यासभेला राज्यभरातून शिवसैनिक हजर राहणार आहेत. या सभेच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
‘सध्या वैचारिक प्रदूषण बरेच वाढले आहे. यामुळे शनिवारच्या सभेत मी मनातील बोलणार आहे’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई मनपाच्या सर्वांसाठी पाणी धोरणाचा शुभारंभ करताना जाहीर केले होते. त्यावरून उद्धव ठाकरे विरोधकांचा चांगलाच समाचार घेणार आहेत, असे दिसते. भाजपाचे आरोप, आघाडीच्या नेत्यांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया, मनसेचा भोंगा वाद, हनुमान चालीसा, हिंदुत्व या मुद्यावर मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडून या सभेचा आता तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही आक्रमक विधानं आहेत. त्यावरून सभेचा मूड स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरेंनी काय दिला आहे इशारा?
- मुंबई मनपाच्या ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रमाचा शुभारंभ ७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला.
- त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेचे आसूड ओढत १४ मे रोजी असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातील भाषणाबद्दलचं नियोजन मांडलं.
- महाराष्ट्रात सध्या वैचारिक प्रदूषण खूप वाढले आहे.
- त्या १४ तारखेला होणाऱ्या सभेत मी काहीजणांचे मास्क उतरवेन. अनेकजण सरकारला काम करु देत नाहीत.
- काम केले तर भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारली जाते.
- आपण म्हणजे गंगेत न्हाऊन शुचिर्भूत झालो आहोत आणि बाकीचे भ्रष्टाचारी हा आव आणला जातो.
- राजकारण जरूर करा, पण त्यामध्ये एक दर्जा असला पाहिजे.