मुक्तपीठ टीम
आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून शौर्य पदक विजेत्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी हिंडन हवाई दल तळावर सत्कार सोहळ्याचे आयोजन १४ ऑगस्टला केले होते. या सोहळ्यात पुढील शौर्य पदक विजेत्यांना सहकुटुंब सन्मानित करण्यात आले.
- दिवंगत मेजर मोहित शर्मा अशोक चक्र सेना पदक
- कर्नल तेजेंद्र पाल त्यागी वीरचक्र
अशोक चक्र सन्मानित दिवंगत मेजर मोहित शर्मा यांचे माता -पिता राजेंद्र प्रसाद शर्मा आणि सुशीला शर्मा, कर्नल तेजेंद्र पाल त्यागी आणि त्यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होते. एअर कमोडोर मनिष कुमार गुप्ता, AVSM एअर ऑफिसर कमांडिंग, हवाई दल स्टेशन यांनी स्टेशन कर्मचारी आणि इतर निमंत्रितांच्या उपस्थितीत, शौर्य पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित केले.
आपल्या उज्वल सेवा काळात उच्चतम लष्करी गुणवत्ता कायम केल्याबद्दल शौर्य पदक विजेत्यांची एअर ऑफिसर कमांडिंग यांनी प्रशंसा केली. GAP पोर्टलवर नोंदणी केलेल्या एकूण चार विद्यार्थ्यांनाही या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले गेले होते.
आपल्याला दिलेल्या सन्मानाबद्दल भारावून गेल्याची आणि सन्मानित झाल्याची भावना पदक विजेत्यांनी यावेळी व्यक्त केली.
शौर्य पदक विजेत्यांचे धैर्य आणि शौर्य यांचा प्रत्यय देणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स यावेळी दाखवण्यात आल्या. त्यामध्ये १९७१ च्या युद्धात सैनिकानी झेललेली आव्हाने तसेच २००९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांसाठीच्या शोधमोहिमेत सैनिकांनी किती आव्हानांना तोंड दिले याचे दर्शन घडवण्यात आले.वीर चक्र सन्मानित कर्नल टी पी त्यागी यांनी त्यांचा १९७१च्या युद्धातील अनुभव उपस्थितांना सांगितला.