मुक्तपीठ टीम
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रथमच गाजलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत, तर डॉ. भालचंद्र मुणगेकर उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. मताधिकार असलेल्या ३४पैकी ३१ मतदारांनी मतदान केले. श्री. पवार यांना मतदान झालेल्या एकूण ३१ मतांपैकी २९ मते मिळाली आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीविरोधात लढणारे आपचे नेते धनंजय शिंदे यांना फक्त २ मतांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत मताधिकार सहा हजार सदस्यांपैकी फक्त ३४ मतदारांनाच दिला गेल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. अध्यक्षपदासाठी मतं मागणाऱ्या श्री. पवार आणि श्री. शिंदे या दोन्ही उमेदवारांना मताधिकार नव्हता! आपचे उमेदवार धनंजय शिंदे यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
शरद पवारांच्या पॅनलमध्ये कोण होते?
दुसरीकडे मुंबई मराठी संग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तर एकूण सात उपाध्यक्ष पदांसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शशी प्रभू, रामदास फुटाणे , निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत हे प्रमुख दावेदार होते.
शरद पवारांच्या पॅनलविरोधात रिंगणात कोण होते?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव समितीतर्फे या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय शिंदे, उपाध्यक्ष पदासाठी डॉ संजय भिडे, प्रमोद खानोलकर, सुधीर सावंत, झुंझार पाटील, डॉ.रजनी जाधव, अनिल गलगली, आनंद प्रभू, संतोष कदम हे शरद पवार गटाविरोधात उभे होते.
आजवर अर्जही न करता नेमणुका, आपच्या धनंजय शिंदेंमुळे प्रथमच आव्हान!
डॉ. भालचंद्र मुणगेकर वगळता इतरांची नेमणूक शरद पवार यांच्या सूचनेनुसार २०१७ पासून वादग्रस्तरित्या झाली असून याबाबत अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी अजून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून कोणीही यापूर्वी संग्रहालयाच्या निवडणूकीचा साधा अर्जही भरला नव्हता. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच कोणत्या या निवडणुकीत धनंजय शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे. संग्रहालयाच्या सर्व सभासदांना घटनेप्रमाणे निवडणूकीत भाग घेण्याचा हक्क असूनही संग्रहालयाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फक्त ३४ सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या हाती संग्रहालयाची सूत्रे सोपवण्याचा घाट घातला आहे, असा आरोप शिंदे यांच्याकडून केला गेला होता.
सहा हजारांच्या संस्थेत ३४ जणांनाच मताधिकार!
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने जाहीर केलेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत अनिल गलगली यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
- अनिल गलगली यांनी माघार घेताना अनेक महत्वाचे मुद्दे मांडले होते.
- ही निवडणूक घटनेच्या नियम १०.१ प्रमाणे खुली निवडणूक व्हायला हवी. प्रत्येक सभासदाला मतदान करून अध्यक्ष/उपाध्यक्ष निवडून देण्याचा हक्क मिळायला हवा असे अनिल गलगली यांचे मत आहे.
- यासाठी गलगली यांनी विनंती पत्र लिहून सर्व सभासदांना निवडणूकीबाबत माहिती देण्याची तसेच आवश्यक भासल्यास निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
- परंतु निवडणूक यंत्रणेनं गलगली यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व सहा हजारांपेक्षा अधिक सभासदांऐवजी केवळ ३४ साधारण सभेवर निवडून आलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक घेतली गेली.
- निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयाला कोणत्याही नियमाचा आधार नाही आणि निर्णयामुळे गलगली यांनी अर्ज मागे घेतला होता.