मुक्तपीठ टीम
बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल शरद पवारांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्याबद्दल माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी घनिष्ठ संबंधांतून उद्भवलेल्या प्रकरणाच्या परिणामांची धनंजय मुंडेंना कल्पना असावी, त्यामुळेच त्यांनी उच्च न्यायालयातून आदेश प्राप्त केला होता, असं म्हटलं आहे. मात्र, आरोप गंभीर असल्यानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलूनच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ माजला असून राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विरोधीपक्ष नेत्यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचे भाष्य करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच पक्षप्रमुख शरद पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावले उचलली जातील”, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच “धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली आहे. हे प्रकरण असे होईल आणि व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन आपले म्हणणे मांडले होते. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असे पुढे त्यांनी सांगितले.
“या आरोपाचे स्वरुप गंभीर आहे. यासंबंधी पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांशी अद्याप चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन विषय मांडणार आणि पुढील पाऊले टाकले जातील. तसेच याला जास्त वेळ लागेल असे वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ,” असेही शरद पवार म्हणाले.
नवाब मलिक राजीनाम्याविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, “नवाब मलिक यांच्यावर व्यक्तीगत असा कोणताही आरोप झालेला नाही. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाला आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणे आणि वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना संबंधितांकडून सहकार्य होईल याची खात्री आहे. गेली अनेक वर्ष नवाब मलिक राजकारणात आहेत. पण त्यांच्यावर कधीच आरोप झालेला नाही,”
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही घटनेवर भाष्य केलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.