मुक्तपीठ टीम
भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौथा कसोटी सामाना खेळला जात आहे. पण या कसोटी सामन्यातही भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली खेळी करण्यास अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण सामन्यात बाद झाल्याने विराटने क्रिकेट प्रेमींच्या अपेक्षांचा भंग केला. विराट पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. या मालिकेत विराट दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला आहे.
कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर आउट झाल्याने विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे दोघही कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून तब्बल ८ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. सामन्याच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी विराट उतरला होता. पण आठ चेंडू खेळल्यानंतर बेन स्टोक्सच्या चेंडूवर तो शुन्यावर बाद होत पॅव्हिलियनमध्ये परतला.
गेल्या सव्वा वर्षापासून विराट कोहलीने एकही शतक ठोकलेले नाही. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध विराटने शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर बहुतेक सामन्यात त्याला चांगली खेळी करता आली नाही.
महेंद्रसिंग धोनीच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी करताना विराट कोहलीने धोनीच्या सर्वाधिक ६० कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपदी असल्याच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. विराटने आतापर्यंत ५९ पैकी ३५ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.
कोहली इंस्टावर मोदींपेक्षा ‘विराट’ लोकप्रिय!
इंस्टाग्रामवर टीम इंडियाचा कर्णधार हा देशाचे कर्णधार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट लोकप्रिय आहे. इस्टावर नरेंद्र मोदींचे ५ कोटी १२ लाख फॉलोवर्स आहेत. तर विराट कोहलीचे १० कोटी फॉलोवर्स झालेत. तो १० कोटी फॉलोवर्सचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय आहे. एकीकडे सोशलमीडियावरील हे यश आणि दुसरीकडे मोदींच्याच नावाच्या स्टेडियममध्ये विराटने केलेला लाजिरवाणा विक्रम!