उदयराज वडामकर/ कोल्हापूर
पुरोगामी महाराष्ट्राचे लोकराजे असणाऱ्या शाहू महाराजांच्या जयंतीचा लोकोत्सव कोल्हापुरात दणक्यात साजरा होत आहे. राजश्री शाहू समिती लोकोत्सव समिती व सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लोकप्रबोधनाचे संदेश देणारे देखावे होते. राजश्री शाहू महाराजांच्या भूमिकेत विजय खोचीकर रथावर स्वार झाले होते.
कोल्हापूरचे लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची १४८वी जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजश्री शाहू समिती लोकोउत्सव समिती व सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत विविध सामाजिक प्रश्न मांडत लोकप्रबोधन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे संदेश देणारे देखावे होते.
तसेच बारा बलुतेदारी सामाजिक प्रबोधनावर फलकही लावण्यात आले होते. शाहू महाराजांनी केलेल्या कार्यामुळे घडलेल्या कायापालटाची माहितीही विविध फलकांवर झळकत होती.विजय खोचीकर यांनी सजीव देखाव्यांमध्ये राजश्री शाहू महाराजांची भूमिका रथावर स्वार होऊन केली होती .
शाहू जयंतीचा सोहळा हा लोकराजांच्या जयंतीचा लोकोत्सव म्हणून साजरा होत असल्यानं कोल्हापूरकर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष उत्साहाने त्यात सहभागी होतात. याही मिरवणुकीत स्त्रियांच्या भगव्या साड्या व फेटा मिरवणुकीचे खास आकर्षण होते. तसेच धनगर ढोल ताशा, हलगीच्या ठेक्यावर लेझीमसह चालणारे नृत्य लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे मिरवणुकीची भव्यता झळकत होती.