मुक्तपीठ टीम
सावधान…एकच आवाज घुमाला आणि श्री महाकालेश्वरांची शाही स्वारी निघाली! अवघ्या उजैन नगरीला श्रावणाच्या सोमवारी उत्सवस्थळाचे स्वरुप आले होते. लाखो शिवभक्तांची गर्दी मंदिरापासून शाही स्वारीच्या सहा किलोमीटरच्या मार्गावर दाटली होती. बाबा महाकाल सहा रुपांमध्ये स्वारीवर निघतात. भव्य मिरवणूक निघाली. हत्ती, घोडे, पालखी आणि महाकालेश्वरांवर अभिषेक करणारा रिमझिम पाऊस. सारं काही डोळ्यांचे पारणं फेडणारं.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेलं श्री महाकालेश्वरांचं ज्योतिर्लिंग स्थान हे अवघ्या जगातील शिवभक्तांचं आराध्य स्थान. नेहमीच या स्थानी शिवभक्तांची रिघ असते. श्रावणी सोमवारचं एक वेगळं महत्व आहे. या सोमवारी महाकाल बाबांची शाही स्वारी निघाली. या शाहीस्वारीत महाकाल सहा रूपात भ्रमणावर निघाले. रिमझिम पावसाच्या नैसर्गिक अभिषेकात स्नान करत लाखो शिवभक्त उज्जैनला पोहोचले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे सुपुत्र महाआर्यमन हेही स्वारीत सहभागी झाले. त्यांनी महाकालाची पूजा केली.
शाही स्वारीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर वधूप्रमाणे सजले होते. भगवान श्री महाकालेश्वराची शाही स्वारी सोमवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता महाकालेश्वर मंदिरातून शाही थाटात निघाली. परंपरेप्रमाणे शाही स्वारी निघण्यापूर्वी आयुक्त संदीप यादव आणि पोलीस महानिरीक्षक संतोष कुमार सिंह यांनी भगवान श्री चंद्रमौलेश्वर यांच्या पत्नीची पूजा केली. पंडित घनश्याम शर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शाही स्वारीमध्ये भगवान श्री महाकाल चांदीच्या पालखीतून चंद्रमौलेश्वराच्या रूपात बाहेर पडले.
शाही स्वारीच्या आधी मंदिरात पोलीस बँडने जोरदार सादरीकरण केले. स्वारीमध्ये बाबा महाकालांच्या पालखीत चंद्रमौलेश्वर, हत्तीवर मन महेश, नंदीवर उमा महेश, गरूड राठेवर शिव तांडव, डोलरथावर होळकर आणि सप्तधन दर्शनासाठी निघाले आहेत. दरवर्षाप्रमाणेच याही वर्षी लाखो शिवभक्तांनी या शाही सवारीला गर्दी केली. सात किलोमीटर लांबीचा मार्ग नववधूसारखा सजवण्यात आला होता. पारंपारिक मार्गाने ही शाही स्वारी रात्री साडेदहा वाजता मंदिरात पोहोचली.
कशी निघाली महाकालांची शाही स्वारी…
- भगवान महाकाल सहा रूपात दर्शन देण्यासाठी बाहेर निघाले.
- पाच बँड पथकं शाही स्वारीच्या आगमनाची नांदी देत होते.
- तब्बल ७० पथकं शाही स्वारीत सहभागी झाले.
- सुरक्षेसाठी १८०० जवान तैनात होते.
- शाही स्वारीची मिरवणूक सात किलोमीटर अंतरावर निघाली.
- महाकालांचे भक्त सहा तास शाही स्वारीच्या भक्तीच्या आनंदान न्हाले.