मुक्तपीठ टीम
न्यायालयात ईडीने आज धक्कादायक असा मोठा आरोप केला आहे. मुंबईतील पत्रा चाळ हजार कोटींच्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार संजय राऊतच असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. तर राऊतांच्या वकिलांनी प्रतिवाद करताना दावा केली की, त्यांच्याकडे असलेला पैसा हा काही ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या उत्पन्नाचाही आहे. ईडी आरोप करते, तसा घोटाळ्याचा नाही! दरम्यान, न्यायालयातही ईडी आणि राऊतांच्या वकिलांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगला. त्यातही महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर राऊतांविरोधात ईडीचा गैरवापर झाल्याचा राऊतांकडून झालेला युक्तिवाद महत्वाचा होता.
गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आज ईडीने न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टानेही त्यांना ४ ऑगस्टपर्यंत राऊतांना ईडीची कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. या सुनावणी दरम्यान ईडीने मोठा आरोप केला आहे. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, असा युक्तीवाद संजय राऊत यांच्या वकिलाने केला आहे.
घोटाळ्याचे राऊतच सूत्रधार! ईडीकडून गंभीर आरोप…
- प्रविण राऊत पत्रा चाळ पुनर्विकासाचे काम पाहत होता. त्याला HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले.
- त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले.
- संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत ३७ लाख प्रविण राऊतने दिले आणि नंतर त्यातून दादर येथील फ्लॅट घेतला.
- राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला.
- अलिबाग येथे जमिन खरेदी केली ती याच पैशातून केली.
प्रवीण राऊत नावाला, खरे सूत्रधार संजय राऊतच!
- प्रवीण राऊत फक्त नावाला होता तो संजय राऊत यांच्या वतीने सर्व व्यवहार करत होता.
- मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले.
- दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे.
राऊतांच्या वकिलाकडून युक्तीवाद!!
- संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने आहे.
- या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत इतकी दिवस का नाही कारवाई केली, कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती.
- स्वप्ना पाटकर या महिलेशी काही कारणाने वाद झाले होते त्याचा धागा पकडत हे आरोप करण्यात आले आणि ही कारवाई करण्यात आली.
- वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बॅंक खात्याने घेतले असते का?
- घर घेतले असेल किंवा जमीन घेतली असेल सर्व पैसे कायदेशीररित्या चुकते केलेत कायदेशीर मार्गाने कमावले होते ते पैसे आहे.
- त्यांच्याकडे असलेला पैसा हा काही ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या उत्पन्नाचाही आहे.
- ईडी कोठडी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये कारण ही कारवाईच राजकीय हेतूने करण्यात आली.
- संजय राऊतांच्या ह्रदयविकाराच्या समस्येमुळे चौकशीत सूट
- संजय राऊतांना ह्रदयविकार असल्याचे न्यायालयात वकिलांनी सांगितले.
- वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने राऊतांची चौकशी रात्री १०.३०पर्यंतच करण्याची परवानगी दिली.
- तसेच राऊतांच्या चौकशीच्या वेळी वकिलाही उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- वकिल फक्त हजर असतील, ते चौकशीत काही हस्तक्षेप करणार नाहीत.
- ईडीकडून राऊतांच्या जबानीत काही फेरफार केला जाऊ नये, यासाठी राऊतांकडून ही मागणी करण्यात आली, ती न्यायालयाने मान्य केली.