रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
आज आंतराष्ट्रीय कन्या दिवस!
मुलगी शिकली, प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ अशी अनेक घोषवाक्यं मुलींच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण वापरतो. कारण देशात परिस्थितीच तशी आहे. काही माणसं मुला-मुलींमध्ये भेदभाव करतात. अनेक मात्र लेकींना लेकापेक्षाही जास्त आपुलकीनं महत्व देत वाढवतात. अशांसाठी आज कन्या दिवस म्हणजेच Daughter’s Dayची ओळख करून देत आहोत.
कन्या दिवस कधी आणि का साजरा करतात?
दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी कन्या दिन साजरा केला जातो. या वर्षी २६ सप्टेंबर म्हणजे आज कन्या दिन साजरा केला जाईल. कन्या दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मुलींना मुलगा म्हणून समान महत्त्व आणि आदर देणे हा आहे. या विशेष दिवशी मुलींना त्यांची कामगिरी आणि त्यांचे महत्त्व सांगितले जाते. त्याच वेळी, मुलींना असे वाटते की, त्या कोणत्याही प्रकारे मुलांपेक्षा कमी नाहीत. मुलींना पालक भेटवस्तू देतात. त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करतात.
भारतात मुलींना वेगळे महत्त्व दिले जाते. पूर्वी मुलींचा बाल विवाह करायचे. त्यांची भूमिका फक्त चूल आणि मूल इथ पर्यंतच मर्यादित होती. ही वाईट प्रथा आजही देशात अनेक ठिकाणी सुरू आहे, पण एका मोठ्या वर्गाची विचारसरणी बदलली आहे, त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी कन्या दिनालाही खूप महत्त्व आहे.
कन्या दिवस कसा साजरा करावा?
- तसे लेकीचे लाड पुरवले जातातच, पण कन्या दिवशी फक्त तिचंच ऐका. तिच्या मनासारखं वागा.
- कन्या म्हणजे लेक ही प्रत्येक पित्याची राजकन्याच! त्यामुळे किमान या दिवशी तिला खरोखरच राज्यकन्येसारखंच वागवा.
- शक्य असेल तर तिला तिच्या उपयोगाची आणि आवडीची भेटवस्तू देऊ शकतात.
- तिच्या आवडीचे खास खाद्यपदार्थ घरी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकता.
- नेहमी वेळ दिलाच पाहिजे, पण आज मुलींसोबत थोडा जास्त चांगला वेळ घालवा.
- मुलींना सांगा, की त्या मुलांपेक्षा कमी नाहीत आणि पालकांसाठी त्यांच्या आयुष्यात त्या किती महत्त्वाच्या आहेत.
- मुला -मुलींवर समान प्रेम आणि समान सन्मान कसा करावा हे पालकांनी सांगितले पाहिजे.
- पालकांनी असेही सांगितले पाहिजे की मुलींनी कोणत्याही प्रकारे घाबरू नये आणि प्रत्येक समस्येचा खंबीरपणे सामना केला पाहिजे.