मुक्तपीठ टीम
रमाई घरकुल निर्माण समितीअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा विस्तृत तपशील तातडीने पाठविण्यात यावा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
लातूर जिल्हा रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे राहणीमान उंचावण्याबरोबर त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी शासनामार्फत पक्के घर बांधून देण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रात निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड करुन घरकुल निर्माण समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत मंजुर कामांसाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरवाही करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सागितले.
या बैठकीत सन २०१९-२० या वर्षातील शिल्लक उद्दिष्टानुसार २९१५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली तसेच सन २०२०-२१ मधील ६८२७ उद्दिष्टापैकी १६४५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. सन २०२०-२१ मधील उर्वरीत उद्दिष्टांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी दिल्या तसेच शहरी भागासाठी प्रलंबित असलेल्या २७ कोटी रुपये अपेक्षित निधीचा पाठपुरावा करण्याच्या सुचनाही दिल्या.