मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून ‘जगण्यातलं संविधान’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, स्तंभ लेखक सॅबी परेरा, कीर्तनकार सचिन पवार, प्राध्यापक राहुल सरवटे, प्राध्यापक गायत्री लेले, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे वक्ते सहभागी होणार आहेत, तर डॉ. दीपक पवार हे संवादक आहेत.
या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेले ‘कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे हे दुसरे प्रकाशन आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त लिंगभाव समतेवर आयोजित केलेल्या अनुभवलेखनाचे संकलन आहे. या पुस्तकात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी लिंगभाव समता आपल्या जगण्यात आणताना केलेल्या संघर्षाचे अनुभव कथन आहे.
तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी दालन उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने निवडणूक व लोकशाही साक्षरतेसाठी ल्युडो, सापशिडी या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाची मूलभूत माहिती होण्यासाठी ‘संविधान भिंत’ उभारण्यात येणार आहे आणि पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राजश्री शाहू सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.