मुक्तपीठ टीम
विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबना होते आहे. महापालिकेने त्यासाठी तत्काळ स्वतंत्र सोय उपलब्ध करून द्यावी आणि या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून द्यावे अशी मागणी, ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सीमा सावळे म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. त्यामध्ये वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना लसीचा पहिला डोस व पुढे ८४ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येतो. कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना सध्या लस दिली जात नाही.
पिंपरी चिंचवड माहापालिका हद्दीतील अनेक होतकरू विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. अनेक देशांनी विदेशातून येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण केल्या शिवाय आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विदेशात जाणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची देखील हीच अडचण आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच याबाबतची नियमावली देखील मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विदेशात जायचे आहे त्यांनी ओळखपत्रासोबतच ज्या देशात शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबाबतचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.
मुंबई महापालिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे मोफत लस देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. जेणे करून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी कळकळीची विनंती सिमा सावळे यांनी केली आहे.