मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली आहे. पंजाब सीमेवरूनच वाहनांवर वैयक्तिक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग लावले जातील. अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होताच तिथून त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. दक्षिण बनिहालबाबत सुरक्षा दल अधिक सतर्क आहेत. याशिवाय जम्मू कॅम्प ते उमधापूर मार्गावरील सुरक्षेबाबत पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.
सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक प्रवाशाला आरएफआयडी टॅग देण्याचा विचार आहे जेणेकरून प्रवासी दर्शनानंतर ज्या ठिकाणाहून त्याने प्रवास सुरू केला त्या ठिकाणी तो सुरक्षितपणे पोहोचू शकेल. त्यांनी सांगितले की, हे खूप आव्हानात्मक काम आहे कारण त्यासाठी अधिक मॉनिटर्सची आवश्यकता असेल.
३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी निमलष्करी दलाच्या ५० कंपन्यांवर असेल. यामध्ये सीआरपीएफच्या ४० कंपन्यांचा समावेश आहे. ड्रोन हल्ला होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत. गेल्या काही महिन्यांत बीएसएफ आणि लष्कराने पंजाब आणि जम्मूमध्ये पाकिस्तानातून येणारे अनेक ड्रोन पाडले होते. यातील अनेक ड्रोन असे होते की त्यांच्यासोबत शस्त्रे पाठवली गेली होती. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात नियंत्रण सीमेजवळ कोणत्याही असामान्य हालचालींची नोंद झालेली नाही. पण परिस्थिती कधीही बदलू शकते आणि दहशतवादी अमरनाथ यात्रा उधळण्याचा प्रयत्न करू शकतात.