मुक्तपीठ टीम
जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित ‘बनी’ या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. ‘बनी’चे स्क्रिनिंग येत्या २७ ऑगस्ट २०२२ रोजी, सायंकाळी ७:२० वा. टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या, त्यातून १३७ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील ‘गुठली लड्डू’ आणि मराठीतील ‘बनी’ या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली असून येत्या २६ व २७ ऑगस्ट २०२२ रोजी हा महोत्सव अमेरिकेतील आर्कान्सा, फोर्ट स्मिथ, यूएसए, संपन्न होणार आहे. साय-फाय, ड्रामा, कॉमेडी, थ्रिलर, ऍक्शनसह इतर अनेक शैलींतील ३० हून अधिक देशांच्या विविधरंगी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन ‘फोर्थ स्मिथ’च्या ‘बॉर्डरलँड्स’ मध्ये दर्शन होणार आहे.
‘बनी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल लेखक दिग्दर्शक निलेश उपाध्ये सांगतात “विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतू त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे.”
अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल ते म्हणतात, “विलक्षण कथा आणि उत्तम टीमवर्कमुळे आज ‘बनी’ सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय, दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने डीओपी कार्तिक काटकर यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे म्हणता येईल.”
बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे. कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं असून साउंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. बनीचं संकलन योगेश भट्ट याचं असून पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे. स्थिरचित्रण निखील नागझरकर यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन विशाल पाटील, सुनील जाधव याचं आहे. वेशभूषाकार पल्लवी दळवी, केशभूषा प्रफुल्ल कांबळे, स्वाती थोरात, रंगभूषाकार ललित कुलकर्णी, डीआय हितेंद्र परब तर प्रोमो डिझाईन पंकज सपकाळे यांनी केले आहेत. कार्यकारी निर्माता दिगंबर बोईवार, लाईन प्रोडूसर विजय देवकर, निर्मिती सूत्रधार महादेव शिंदे, यासीन आली, प्रसिद्धी डिझाईन्स सचिन डागवाले, सोशल मीडिया मॅनॅजमेन्ट समीर भोसले, प्रसिद्धी प्रमुख राम कोंडीलकर, फेस्टिव्हल कॉर्डीनेशन मोहन दास यांचे आहे.