मुक्तपीठ टीम
किन्नरांच्या उन्नतीबद्दल सध्या खूप बोलले जाते. पण त्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांना इतर माणसांसारखंच सन्मानानं जगता यावं, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेनं सुरु केलेला उपक्रम हा एक चांगली बातमीच आहे. वसईतील या स्वयंसेवी संस्थेने किन्नरांचं सक्षमीकरण व अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एक शाळा उघडली आहे. जिथे तृतीयपंथीयांना विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे.
वसई परिसरातील किन्नरांनी या महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या रेखा त्रिपाठी यांच्याकडे आपल्या समस्या व्यक्त केल्यावर ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. किन्नरांकडे शिक्षण घेण्यासाठी खूप कमी मार्ग आहेत. मात्र, काहीच लोक असे आहेत जे त्यांना शिकविण्यासाठी इच्छुक आहेत, असे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा रेखा त्रिपाठी म्हणाल्या की, “सर्वाना शिक्षणाचा समान हक्क आहे. कोणीही शिक्षणात लिंग भेद करू नये. सर्व एकसमान आहेत. सर्वांना समान प्रवेश मिळणार, शिक्षणही मिळणार यावर माझा ठाम विश्वास आहे.” असे त्या म्हणाल्या.
वेगळी शाळा का?
• रेखा त्रिपाठी किन्नरांसाठी वेगळी शाळा का, ते समजवून सांगतात.
• आतापर्यंत सुमारे २५ प्रौढ आणि काही मुले शाळेत दाखल झाली आहेत.
• काही वर्षांपूर्वी एका तृतीयपंथीय व्यक्तीने मला समजावून सांगितले की, या समुदायातील अनेकांना नोकऱ्या मिळण्यासाठी अडचणी येत आहेत
• त्यांना मूलभूत शिक्षणही घेता येत नाही.
• वाईट आर्थिक परिस्थितीमुळे तसेच समाजामुळे या समस्येला हातभार लागला आहे.
• त्यावर मार्ग काढत त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी हा वेगळा प्रयत्न आहे.