मुक्तपीठ टीम
गेलं दशकभर देशात गाजत असलेल्या फरार उद्योगपती विजय मल्ल्याला एका प्रकरणात शिक्षा झाली आहे. हे प्रकरण त्यांच्यावरील हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे नाही. तर त्याने आपल्या आर्थिक व्यवहारांसबंधी न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाचा अवमान केल्याचं आहे. या अवमान प्रकरणी विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच ४० दशलक्ष डॉलर्स जमा करण्याचेही आदेश दिले आहे.
न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ४० दशलक्ष डॉलर्स आपल्या मुलांना हस्तांतरित केल्याची माहिती दडवून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल विजय मल्ल्याला मागेच दोषी ठरवले होते.
अवमान प्रकरणी गुन्हा दाखल
- विजय मल्ल्याला अनेक बँकांचे ६,२०० कोटी रुपयांहून अधिक परत करण्याचे आदेश देण्यात आले होते
- ब्रिटीश स्पिरिट निर्माता डिएजिओकडून $४० दशलक्षचा व्यवहार उघड केला नसल्याबद्दल अवमानाचा दावा केला गेला.
- यापूर्वी विजय मल्ल्याला शेवटची संधी देताना न्यायालयाने, नाहीतर शिक्षेच्या मुद्द्यावर पुढील निर्णय मल्ल्याच्या अनुपस्थितीत घेतला जाईल, असे सांगितले होते.
विजय मल्ल्यावर आहेत कर्ज घोटाळ्याचे आरोप
- सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, बँकांनी फरारी विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून एकूण १८,००० कोटी रुपये वसूल केले आहेत.
- विजय मल्ल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या बँक कर्ज प्रकरणात आरोपी आहे.
किंगफिशर एअरलाइन्सप्रकरणी गुन्हा
- विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सवर १.०५ अब्ज पाउंड्सच्या कर्जाबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या समुहाने गुन्हा दाखल केला होता.
- ब्रिटनमधील एका न्यायालयाने मल्ल्या यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांबाबत दिवाळखोरी घोषित केली होती.
- याला उलट करण्यासाठी मल्ल्याने लंडनच्या न्यायालयात दाद मागितली आहे.