सायली पावसकर
नवरात्रीचा उत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शक्तीचे प्रतीक असणाऱ्या देवीचा भक्ती सोहळा अगदी आनंदात साजरा होतो. परंतु नवरात्री उत्सवात देवीच्या मूर्तीची जितकी आराधना होते तेवढीच किंबहुना त्याहून जास्त आपल्या सोबत राहणाऱ्या जिवंत महिलेचे शोषण होत आहे. एकीकडे देवी म्हणजे माता आणि दुसरीकडे पायातली वहाण किंवा एक वस्तू हा विरोधाभास बघायला मिळतो आणि यावर तात्विक प्रहार करणे आवश्यक आहे. त्याचसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी एक रचनात्मक पुढाकार घेऊन रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित काव्यरचनांना ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान समाज माध्यमाद्वारे (सोशल मीडिया) प्रस्तुत करत आहोत. या निमित्ताने प्रत्येक जनमानसाशी चर्चा संवाद साधत आहोत.
या पुढाकाराच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकात माणूस असण्याची जाणीव रुजवत आहोत. कर्मकांड नव्हे तर विवेकशील व्यक्ती म्हणून जगण्याची चेतना पेटवत आहोत.
“वैचारिक संकल्पाचा जागर” हा विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा कलात्मक संकल्प आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही नव्या रंगसंवादाला सुरुवात केली आहे. आपल्या कलात्मकतेने अभिव्यक्त होऊन व्यक्तीच्या व समाजाच्या विचारांना मानवीय चैतन्याचा स्पर्श करत आहोत.
कलाकार म्हणून जगणे ही एक यात्रा आहे. निरंतर सुरू राहणारी शोध यात्रा.
शोध संकल्पनांचा, जीवनातल्या नव्या आयामांचा, शोध माणूस म्हणून जगण्याचा आणि हे जगण्याचे सत्व प्रत्येकाला देण्याचा.
आम्ही “थिएटर ऑफ रेलेवन्स” चे रंगकर्मी आमच्या रंगकर्मातून अभिव्यक्तीच्या पुढे जाऊन परिस्थितीशी, काळाशी लढण्याचा संकल्प जागृत करतो आणि जीवन अनुभवांचा नाट्य सृजनेशी साधर्म्य साधत असतो.संकल्प कलात्मकतेचा, माणुसकीचा, न्यायसंमत जगण्याचा , नवी पिढी घडवण्याचा ही दृष्टी या पुढाकाराचा पाया आहेत.
एक कलाकार म्हणून आम्ही आमच्या आतील माणूसपणाच्या जाणिवेला, जीवनानुभवाला आणि समाजाच्या या विरोधाभासाला मंजुल भारद्वाज रचित काव्य रचनांच्या माध्यमातून मांडले आहे.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज हे आपल्या सृजन सत्वाने काळाला थेट भिडत आहेत. दृष्टिगत संकल्पनांनी एक नवीन काळ आपल्या लेखणीतून ,आपल्या कलाकृतीतून सृजित करत आहेत.
आज विकारी सत्ता भय,भ्रम,संभ्रमाच्या दहशतीने समाजाला चिरडत आहे, कुंठित करत आहे. सांस्कृतिक सृजनकार या दृष्टीने आम्ही रंगकर्मी रंगभूमीला तसेच विश्वाला घडवण्यासाठी आमची भूमिका घेतली आहे.
जिथे महिलेला देवीचा दर्जा दिला जातो तिथे महिलेची अशी अवस्था का? हा प्रश्न निर्माण करणारी रचना आहे “हिंदू राष्ट्र का पाखंड”. धार्मिक दांभिकपणा आणि त्याच्या ढोंगीपणाचा चेहरा समोर आणणारी ही रचना आहे. देवीची विभिन्न रूपे आणि त्या प्रत्येक स्वरूपाचे विरोधीभासी चित्र समाजात, परिवारात दिसते याला प्रखरपणे रचनाकाराने मांडले आहे.
नवरात्री या उत्सवात नऊ विविध रंगांच्या छटा पाहायला मिळतात ज्याला समाज अगदी आवडीने follow करतो पण त्या रंगांचा नेमका अर्थ काय आहे याचा कधी विचार करतो का आपण? आणि या नऊ रंगांमध्ये आपले आयुष्य गुंडाळून घेणारी भारतीय महिला या रंगांच्या अर्थप्रमाणे कधी जगते का?
बाजारवादामुळे स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहिले जात आहे. नऊ दिवसाचे नऊ विविध रंग परिधान करणे हे बाजारीकरणाचे शोषण षडयंत्र आहे. शोषण करण्याची पितृसत्तात्मक मानसिकता आहे आणि उत्सवात प्रतीकात्मक महत्त्व वाढवून स्त्रीला केवळ एक वस्तू बनवण्याचा षडयंत्र आहे. काळानुसार संदर्भ बदलले तरी महिलांचे शोषण हे शारीरिक, मानसिक, भावनिक रित्या होतच आहे. तिच्या स्वतंत्र मानवी अस्तित्वावर पितृसत्तात्मक व्यवस्थेचा आणि भांडवलशाही – वस्तुकरण प्रवृत्तीचा वार होतोच आहे.
ज्या स्त्रीला स्वत्वाची जाणीव नाही, जिला स्वतःला मुक्त व्हायचे नाही,आपल्या अस्तित्वाचा बोध नाही, आपण माणूस आहोत, एक सृजनकार आहोत ही जाणीव नाही. आपल्यावर होत असलेल्या शोषणा विरुद्ध जिला आवाज उठवता येत नाही,ती अशीच मरत राहणार व मारली जाणार!
हा चेतनात्मक प्रहार करणारी काव्यरचना “वो मरती रहेगी”
आज विकार आपल्या मानस वर इतके हावी होत आहेत की सत्याचा, न्यायचा, मानवतेचा आवाज दाबला जातोय! या सत्याच्या आवाजाला बुलंद करण्यासाठी, विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी एक संकल्प ती घेतेय न्यायासाठी, सत्यासाठी, मानवीय अस्तित्वासाठी “संकल्प” या काव्यरचनेतून !
सुसभ्य, संस्कारी समाजात महिला म्हणजे त्याग, कर्तव्य आणि ममतेचे प्रतीक आहे. समाजाने तिच्या साठी भूमिका ठरवल्या आहेत आणि जी महिला या साच्यांत बसत नाही तिला व्यभिचारी हे लेबल मिळते. त्यामुळे महिलेचे उन्मुक आचरण , तिची अभिव्यक्ती समाजाला मान्य नसते किंवा तिच्या उन्मुक्ततेची समाजाला सतत भीती वाटत राहते. या सत्याला उलगडणारी रचना आहे “संस्कारी समाज में.”
अशा स्थितीत सत्ता वा व्यवस्था जनतेप्रति आपली नैतिक जबाबदारी पूर्ण करत नाही. सत्याची,न्यायाची बाजू घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सत्ता विवेकवादी होण्याऐवजी गप्प राहून अन्यायाचे समर्थन करतेय. हे समाज निर्माणासाठी कितपत योग्य आहे. यावर प्रकाश टाकणारी रचना – “वो चूप रहेगा” !
माणूस म्हणून जगण्याचा निर्धार करणारी ती , जेव्हा संविधानाच्या संरक्षणार्थ उतरते तेव्हा ती संकल्प करते न्याय संगत जगण्याचा, समतेचा , मानवतेचा . ती काळाची गर्जना होते, सनकधारी सत्ता भानावर येते तिच्या एक बोट दाखवण्याने . तेच बोट ज्याने संविधानिक हक्क निभावला आहे देशनिर्माणाचा.ती चेतावणी आहे.परिवर्तनाची ठिणगी आहे.
आपल्या मायभूमीला म्हणजेच आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी मनुष्याला आपली प्रकृती बदलणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ निसर्गाच्या प्रलयाला दोष देण्याऐवजी स्वतःची विवेक बुद्धीला प्रगत करणे, नितीगत विचार करणे आणि प्रकृतीप्रमाणे न्यायसंगत व्यवस्था निर्माण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे!
समाजात केवळ एक प्रतीक म्हणून जगणे पुरेसे नाही, तर प्रतिकात्मकतेच्या पुढे चेतनेची मशाल म्हणून जगणे अनिवार्य आहे. विचार करा …..
प्रतीक टूटकर समग्र नहीं होते!
– मंजुल भारद्वाज
प्रतीक अनिवार्य आहेत
पुरेसे नाहीत
प्रतीक व्यक्तिनिष्ठ आहेत
समग्र नाहीत
प्रतीक अपवाद आहेत
नियम नाहीत
ही परिस्थिती आहे
भारतीय समाजातील महिलांची
भारतीय समाजातील महिला
शक्तीचे प्रतीक आहेत
पण फक्त प्रतीक
वास्तवात दीन हीन पतित आहेत
रामराज्यात अपहरण होते
अग्नि परीक्षा होते
मग मर्यादा पुरुषोत्तम द्वारा
त्यागली जाते
राजपुत्रां द्वारा एका वस्तु प्रमाणे
द्युत क्रिडेत बोली लावली जाते
मग दरबारात चीरहरण होते
ही प्रथा युगा युगांपासून चालत आहे.
प्रतीक तुटत नाहीत
शोषणाचे चक्र भेदत नाहीत
फक्त चिखलात
कमळासारखे फुलत राहतात
चिखल साफ करत नाहीत !
हम हैं ।।।