रोहणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याती बुध गावचा तरूण अभिषेक सूर्यवंशी. सध्या तो पुण्यात असतो. आपल्या क्रीडाप्रतिभेच्या बळावर अभिषेकने फुटबॉल विश्वातील नामांकित मोहन बागान क्लबमध्ये स्थान मिळवलंय. त्याला मालदिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळालीय.
खरंतर आपल्याकडे क्रिकेट सोडल्यास, इतर खेळाबद्दल आणि खेळाडूंबद्दल भारतीयांना फारसे माहित नसते. फुटबॉल सध्या लोकप्रिय होत असला तरी क्रिकेटच्या तुलनेत त्याला तेवढं वलय नाही. तरीही तरुण पिढी फुटबॉलच्या उत्साहात सळसळू लागली आहे. अभिषेक अशा तरुणांपैकीच एक. त्याचे वडिल बुध गावातील धनंजय सूर्यवंशी यांनी त्याच्यावर खास लक्ष दिले. थोडंसं धाडस दाखवतच फुटबॉलमध्ये करिअरसाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे साताऱ्यातून पुण्यात स्थायिक झालेल्या अभिषेकनं गावचा जोश आणि शहरातील प्रशिक्षणाच्या बळावर खेळात प्राविण्य मिळवलं.
काही दिवसांपूर्वी त्याच्या क्रीडागुणांच्या बळावर त्याला मोहन बागान क्लबमध्ये स्थान मिळाले. या महिन्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आशिया कपमध्ये तो खेळणार आहे. मालदीवमध्ये आयोजित य़ा स्पर्धेत तो ‘एटीके मोहन बागान’ या क्लबकडून खेळणार आहे.
अभिषेकनं जागतिक पातळीवर देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्जव करावं, यासाठी सातारच्या बुधगावच्या गावकऱ्यांप्रमाणेच मुक्तपीठच्याही शुभेच्छा.
सुप्रसिद्ध मोहन बागान क्लबतर्फे खेळणार अभिषेक सुर्यवंशी
- मोहन बागान अॅथलेटिक क्लब हा एक भारतीय फुटबॉल क्लब आहे. जो कोलकाता येथे आहे.
- १५ ऑगस्ट १८८९ रोजी या क्लबची स्थापना करण्यात आली, हा भारताचा राष्ट्रीय क्लब आहे.
- त्याला आशियातील सर्वात जुना फुटबॉल क्लब म्हणूनही गौरव प्राप्त झाला आहे.
- भारतातील सर्वात प्रसिद्ध क्लब म्हणून याला स्थान आहे.
- या क्लबने फेडरेशन कप, ड्युरंड कप, नॅशनल फुटबॉल लीग आणि कोलकाता प्रीमियर डिव्हिजन सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत.
- युरोपियन संघाला पराभूत करणारा मोहन बागान हा पहिला भारतीय संघ आहे. या क्लबसोबत अभिषेक खेळणार आहे.
कोच नंदू अंगिरकर यांनी दिली दिशा
अभिषेकच्या फुटबॉलमधील कर्तृत्वाबद्दल गावकऱ्यांकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून बरीच माहिती मिळत आहे. आधी क्रिकेट खेळणाऱ्या अभिषेक जवळ फुटबॉलचे तंत्र आणि कौशल्य असल्याचे नंदू अंगिरवार या कोचच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला क्रिकेटऐवजी फुटबॉलकडे लक्ष देण्यास सांगितले.
वडिलांचं लक्ष, भावाची प्रेरणा!
फुटबॉल साठी आवश्यक असलेला आक्रमकपणा, कौशल्य, तंत्रशुद्धपणा, स्टॅमिना या गोष्टी अभिषेकमध्ये असल्याचे धनंजय म्हणजेच अभिषेकच्या वडिलांच्या लक्षात आले होते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जे.एन.पेटीट या पुण्यातील शाळेमध्ये दाखल केले. खेळासाठी अभिषेकला त्याचा मोठा भाऊ अतुल याच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे.
नंदू अंगिरवार या कोचकडून अभिषेकला सुरुवातीला फुटबॉल खेळाचे प्राथमिक धडे मिळाले. वयाच्या दहाव्या वर्षीच बारा वर्षाखालील स्पर्धांमध्ये त्याला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तिथून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राष्ट्रीय संघांमध्ये त्याला वयाच्या १७ व्या वर्षीच ‘नॉमिनेशन’ प्राप्त झाले होते. ‘ए.टी.के कोलकाता’ च्या ज्युनियर टीमचा कॅप्टन म्हणून त्यांनी यश मिळवले आहे.
पाहा व्हिडीओ: