मुक्तपीठ टीम
देशात कोरोना लसीकरणाने मोठा टप्पा गाठला आहे. मात्र खेड्यापाड्यात लसीकरणासंबंधित तेवढी जागृकता पसरलेली नाही. यासाठीच आता सरकारने पावलं उचलली आहेत. ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल अशा गावातील सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात
- सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ६४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
- यामध्ये जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतींचे १०० टक्के लसीकरण झालेले आहे.
- अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे.
- लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे.
- लसीकरण शिबिरात ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल अशा ग्रामपंचायतींच्या
- सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल.
- याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे.
- मुख्याधिकारी स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. सणासमारंभाच्या पार्श्वभूमीवर तज्ञ्जांनी दिलेला गंभीर इशारा आता खरा ठरताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १२,८३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४६ जणांचा मृत्यू झाला आहे