तुळशीदास भोईटे
महाराष्ट्रच नाही अवघा देश अखंड सुतकात आहे. देशातील काही राज्यांचा अपवाद वगळला तर स्मशानं, कबरस्तान कुठेही क्षणाची उसंत नसेल. प्रत्येक महानगर, शहर, गाव, पाडा क्वचितच असा असेल जिथं कोरोनानं बळी गेल्यामुळे टाहो फोडला गेला नसेल. रोगही असा भयानक की मेल्यानंतर शेवटचे दर्शन करणेही शक्य नाही. इतकी भीषण परिस्थिती असताना सामान्यांना साथ द्यायची सोडून देशातील, राज्यातील अनेक राजकीय नेते जे स्वार्थी राजकीय डाव-प्रतिडाव खेळत आहेत, त्यामुळे राजकारणाच्या बिभत्स दर्शन होत आहे.
ताजा प्रकार शनिवारी रात्री रेमदेसिवीर बनवणाऱ्या एका औषध कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा. खरंच गरज होती? खरंच त्या औषध कंपनी मालकाचं चुकलेलं?
भाजपाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यासह अलीकडेच दमनला ब्रुक्स फार्मा या कंपनीला भेट दिली होती, ही त्या मालकाची चूक असू शकत नाही. तसे प्रयत्न करण्यापासून सत्ता हाती असलेल्या आघाडीच्या नेत्यांना कोणी रोखलेले? जेथे गरज आहे तेथे संघर्ष आवश्यकच, पण काही तरी घडवण्यासाठी संवाद जरा जास्तच अत्यावश्यक!
महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.https://t.co/xvIEiXPD0P#Remdesivir4Maharashtra #Remdesivir pic.twitter.com/SfKMZAM513
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 17, 2021
त्या कंपनी मालकाने केंद्र सरकारने परवानगी दिली तर इंजेक्शन पुरवण्याचे मान्यही केले होते. पण तशी परवानगी मिळवून इंजेक्शन अधिकृतरीत्या मिळण्यापूर्वीच भाजपा नेत्यांनी नेहमीच्या राणा भिमदेवी थाटात प्रदेश भाजपातर्फे राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स भेट देण्याची घोषणाही केल्या. तसे करणे हा त्यांच्या ‘काम कमी बोंबला जास्त’ शैलीतल्या राजकारणाचा भाग झाला. पाडा ना उघडं त्यांना!
तसेच एवढी मोठी दणदणीत घोषणा करणाऱ्यांपैकी आमदार प्रसाद लाड यांनीच नंतर भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांच्या उपचारासाठी रेमदेसिवीर मिळत नसल्याची तक्रार केली. एकीकडे हजारोंच्या दानाची घोषणा, दुसरीकडे स्वत:च्या मोठ्या नेत्यालाच रेमडेसिवीर मिळत नसल्याची तक्रार!
महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस या तीन पक्षाच्या नेत्यांना भाजपाला उघडे पाडायचं असेल तर असा विरोधाभास दाखवत राहावं. तसे न करता उगाच केवळ भाजपाचे नेते भेटले म्हणून मुंबईत राहणाऱ्या कंपनी मालकाला त्रास दिला जाणार असेल तर त्यांना धड राजकारणही येत नाही, असंच म्हणावं लागेल. किंवा मग केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करुन भाजपा ईडी-आयटी-सीबीआय मागे लावते तसे आपण पोलीस-एफडीए मागे लावावे, असे वाटत असेल तर हा उपचार नाही अपचार आहे आणि त्याचे साइडइफेक्ट तुम्हालाच भोगावे लागतील हे आघाडीच्या नेत्यांनी लक्षात ठेवलेच पाहिजे.
It is sad & shocking that when Government of Maharashtra asked the 16 export companies for #Remdesivir, we were told that Central Government has asked them not to supply the medicine to #Maharashtra.
These companies were warned, if they did, their license will be cancelled(1/2)— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेतच आपल्याकडे आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, हे दिसून आले होते. मधला काळ हा ती मजबूत करण्यासाठी उपयोगात आणला गेला पाहिजे होता. पण तसे झाले नाही.
समाजाला पुढे नेतो तो नेता. पण गल्ली ते दिल्ली, अपवाद वगळता, तेवढा दूरचा विचार कोणी करताना दिसत नाही. सोनिया गांधींनी त्यांना दिलेला भेदभावविरहित कारभाराचा राजधर्म सल्ला चुकीचा नाही. केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होतो, हे काही नवे नाही. स्वातंत्र्यापासूनचा तो आतापर्यंतचा नित्यानुभव आहे. मोदींच्या राज्यात तो जास्त खुपेल एवढा जास्त आहे. त्याला विरोध हा केलाच पाहिजे. पत्रकार असलो तरी माझ्यासारखी अनेक मराठी आहोत, हे लक्षात ठेवत दिल्लीशाहीला विरोध करत असतात. करत राहणार. पण महाराष्ट्रावरील अन्यायाला विरोध करणे वेगळे आणि भाजपा काही यंत्रणांचा दुरुपयोग करते म्हणून तुम्हीही करणे हे योग्य म्हणता येणार नाही.
तुम्ही टीका करा. तुम्ही भाजपा नेत्यांना उघडे पाडा. ब्रुक्स फार्माच्या मालकाकडे रेमडेसिवीरचा मोठा साठा आहे. तो देत नाही, तर तुम्ही कायदेशीर मार्ग पत्करा. एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पाठवल्यासारखे दहा पोलीस पाठवणे योग्य वाटत नाही. आणि मग जर योग्य कारवाई होती, तर फक्त चौकशीसाठी बोलवले होते, अशी सारवासारव करण्याची वेळ का आली?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे त्यांच्या प्रयत्नांनंतर केंद्रीय मंत्र्यांनी तो साठा महाराष्ट्राला पुरवण्यासाठी परवानगी दिली असेल त्याची माहिती घ्या. परवानगी असूनही जर ब्रुक्स फार्माचा मालक पुरवठा करत नसेल तर एफडीए मार्फत चौकशी करुन गुन्हा दाखल करा. तशी परवानगी नसेल तर केवळ राजकारणपोटी कारवाई करु नका. मग परवानगी मिळवून दिल्याचे सांगणाऱ्या भाजपा नेत्यांना उघडे पाडा.
भाजपाचे नेते दुसऱ्या राज्यात जातात. औषधी कंपनीला भेट देतात. यात काही चुकले असे वाटत नाही. ते हाती काही नसताना खूप बोलतात. प्रसिद्धी मिळवतात. पण तुम्ही फुकटची प्रसिद्धी घेऊ नका. पण किमान औषध कंपनीच्या मालकांना तर शोधा. त्यांना दहशतीत आणण्याचा मार्ग निवडणारे डोके ज्यांचेही असेल ते ठिकाणावर आहे, असे वाटत नाही. त्यांना राजकारण कळते, असेही म्हणता येत नाही. त्यापेक्षा एखाद्या जबाबदार मंत्र्याने संवाद साधला असता, तर कदाचित भाजपा नेत्यांना श्रेय मिरवण्याची संधी मिळाली नसती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना दिसतात. ते वगळता अन्य कोणी मंत्री महाराष्ट्रासाठी इतरांशी संवाद साधून काही मिळवताना दिसत नाहीत. विरोधक विरोध करत राहतील. त्यांच्या शैलीने आक्रस्ताळेही वागतील. पण किमान तुम्ही रचनात्मक काम करुन दाखवा. जर मोदी सरकारने सर्वच केंद्रीकरण केले असेल तर किमान राज्यातील आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करा. आरोग्य सेवेचे सक्षमीकरण या एकाच लक्ष्यावर संपूर्ण लक्ष दिलंच पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही.
आता थोडे भाजपा नेत्यांविषयी. काय चालले आहे? तुम्ही महाराष्ट्रातील. तुम्हाला मराठी माणसांनी मते दिलीत, किंवा मराठी माणसांनी निवडून दिलेल्यांनी निवडून दिले म्हणून दिल्ली तुम्हाला किंमत देत आहे. नाही तर कुत्रंही विचारणार नाही. आधी कोरोना जशी काय, महाराष्ट्राची समस्या आहे असे बोंबलत देशभर फिरायचं. तेव्हा माझ्यासारख्यांनी कोरोना ही महाराष्ट्रीय नसून राष्ट्रीय समस्या असल्याचे लक्षात आणून दिल्यावर ट्रोल करायचं. चहा-बिस्किट, पाकिट पत्रकार असे हिणवायचे. आता काय झालं आहे. देशभर कोरोना फोफावतोय. महाराष्ट्रात जास्त असला तरी इतर ठिकाणी जे लपवलं ते आता उफाळतंय. तरीही बदनामी केली गेली ती महाराष्ट्राची. केंद्राकडून लसींपासून प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राला सावत्रपणेच वागवले जाते, हे सत्यच आहे. तुम्ही एकदा जरी दिल्लीत महाराष्ट्रासाठी आवाज उठवला असतात तर मराठी माणूस म्हणून अभिमान वाटला असता.
महाराष्ट्राचे दोन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर रात्रीच्या वेळी एका फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात जातात. खरंतर फोनवरही काम झाले असते. तरीही गेले. गैर नाही. एका कंपनीमालकासाठी रात्री पोलीस ठाणे गाठले, तशीच त्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील चौदा कोटी माणसांसाठी दिल्लीत धाव घेतली, तीही महाराष्ट्राला हक्काचं मिळवून देण्यासाठी, तर अभिमान वाटला असता.
त्यामुळेच सर्वांना बजावासं वाटतं. आता बसं झालं. सर्वांनी राजकारण थांबवावं. महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, लसी, इतर साधने पुरेशी मिळण्यासाठी ठाकरे, फडणवीस, पवार, चव्हाण, थोरात, पाटील असे सर्व एकत्र दिसले तर मराठी माणूस अभिमान बाळगेल. तुमचा कृतज्ञ राहील. नाहीतर कोरोना परवडला पण तुमच्या स्वार्थी राजकारणाचा विषाणू नकोच नको, असे तुम्हालाच हा सामान्य माणूस सुनावेल. त्याने राजकारण्यांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळणे तुम्हाला कोणालाही परवडणार नाही. तसे होऊ नये यासाठी आताच सावध व्हा! जास्त काही नको, माणुसकीचे काही सुरक्षा नियम पाळाच पाळा!!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)