तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
नेता कोण असतो? मला वाटतं समाजाला, आपल्या अनुयायांना जो पुढे नेतो तो नेता! माझ्यासाठी नेते असण्याची एका वाक्यातील एवढी सोपी व्याख्या आहे. पण त्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. पुढे नेणे म्हणजे आपल्या मनमानीनं ओढत नेणे नव्हे, तसे करणे म्हणजे तर बिनबुद्धीचे काम झाले. तसे पुढे नेणे कदाचित निसरड्या वाटेवरचं, खाईत ढकलणारंही असू शकतं. पुढे नेणं म्हणजे जीवनात पुढे नेणं. सुरक्षितरीत्या. आपुलकीनं काळजी घेत. काळानुसार बदलत घडवत, पण सत्व आणि स्वत्व न बिघडवत. असे नेते प्रत्येक पिढीतच कमी राहिलेत. आता कसे जास्त असतील? गर्दी असते ती नेते म्हणवणाऱ्या पुढाऱ्यांचीच. बक्कळ गर्दी. खरंतर हा पुढारी शब्द पूर्वीच्या पेंढाऱ्यांच्या खूप जवळचा आहे. केवळ अक्षरांच्याच बाबतीत नाही तर काही पुढाऱ्यांच्या वागण्यामुळे वृत्तीच्याही बाबतीत तसाच!
अशा बेजबाबदार, स्वार्थी पुढारी म्हणवणाऱ्यांची सगळीकडे गर्दी आहे. प्रत्येक क्षेत्रात. राजकारण असो समाजकारण असो पत्रकारिता असो की आणखी इतर कुठलेही क्षेत्र. चेहरे पाहा आणि वृत्ती आठवा लगेच कळेल. अशा या गर्दीत भावतात ते खासदार संभाजी छत्रपती. सध्याच्या मरगळलेल्या आणि किंवा मग एकदम चेकाळलेल्या अशा दोन टोकाच्या सामाजिक आंदोलनांच्या अवस्थांमध्ये नेता म्हणता येईल असे ज्यांचे जबाबदार वागणे दिसले ते म्हणजे संभाजी छत्रपतींचेच!
ही स्तुतिसुमने अगदी मनापासून उधळतो आहे. उगाच नाही. कटूता पत्करत सरळस्पष्ट लिहिताना काही वेळा चांगलंही तेवढंच सरळस्पष्ट लिहावेच. चांगल्याला चांगलंही बोलावेच. संभाजी छत्रपतींना खराखुरा नेता म्हणतो ते त्यांच्या जबाबदार वागण्यामुळे. उगाच नाही.
आज सकाळी संभाजी छत्रपतींचे एक ट्विट पाहिले. त्यांनी लिहिले, “छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही, तर न्याय देणे आहे. आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.”
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
संभाजी छत्रपतींनी हे ट्विट केले त्याला कारण असावे ते त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिकेवर काहींकडून होत असलेल्या हिणकस टीकेचं. काही कारण नसताना थेट बेताल बडबडतात. काही थेट बोलत नसतील. पण आता आर या पारच केलेच पाहिजे. थेट सरकारला भिडले पाहिजे. सरकारला भिडले नाही तर मग काय अर्थ? असे अनेक पुढारी सध्या बोलताना आढळतात. सध्याचा काळ हा साधासुधा नाही. कोरोना संकटाचा आहे. जबाबदारीने वागलंच पाहिजे. गर्दी जमवणं अवघड नसतं. त्यातही संभाजी छत्रपतींसाठी सध्या तरी नाहीच नाही. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या एका आवाहनावर हजारोंनीच लोक रायगडावर जमली असती. पण गर्दी जमली असती पण ती ज्या उद्देशाने जमवायची त्या उद्देशालाच हरताळ फासला गेला असता.
कोरोना महामारीची साथ ओसरत असली तरी संसर्गाचा धोका संपलेला नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत त्यांच्या राज्याभिषेकासाठी एकत्र जमलेल्या मावळ्यांना कोरोना संसर्गाचा दगफटका होणे थोरल्या महाराजांनाही कदापि रुचले नसते. नव्हे त्यांना मनापासून मानणारा कुणीही नेता तसा दगाफटका व्हावा, असं मनातही आणू शकणार नाही. खरंतर आपल्या मावळ्यांची कुटुंबासारखी काळजी घेणाऱ्या शिवरायांचा हा कनवाळूपणा त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या प्रत्येकानेच लक्षात घेतला पाहिजे. बेजबाबदार वागून आपल्या कार्यकर्त्यांचे जीवन धोक्यात आणणाऱ्या कुणालाच महाराजांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार आहे, असे वाटत नाही. त्यामुळेच खासदार संभाजी छत्रपतींनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या नावापुढे असलेल्या छत्रपती बिरुदाला साजेशी वाटली.
संभाजी छत्रपतींनी खरंतर सोहळ्याचं निमंत्रण देतानाच भूमिका स्पष्ट केली होती. ते निमंत्रणही वाचण्यासारखं आहे.
“मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज !
दिनांक ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तशीही सरकारने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे.
यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल.
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते.
सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला.
सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..!
माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन.”
संभाजी छत्रपतींनी असं नेता म्हणूनच वागावं. खरेखुरे नेते म्हणून त्यांचं स्थान मराठी मना-मनात अधिकच मोठं होत जाईल. तसंच त्यांना एक नम्रतेनं सांगणं, कृपया चिथावणारे चिथावत राहतील. पण डोक्यातून झालेल्या कपटी घातपाताचा मुकाबला डोक्यानंच करावं लागेल. तुम्ही म्हणलात तशी योग्यवेळी ताकद दाखवावीच लागेल. पण उठसूठ सामान्य तरुणांची माथी भडकावून वापरून घेण्यापेक्षा त्यांची डोकी वापरत खरी ताकत दाखवता येईल. त्यातून हक्काचं ते सारं मिळवता येईल. रायगडचा विकास करताना आपण सिमेंटची ढिगळं लावणारा सरकारी होऊ न देता तो रायगडाला साजेसा करत आहात. त्यातूनही एक मजबूत विश्वास मनात तयार झाला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढत आहेत. एक आणखी खुपणारा मुद्दा.
सध्या पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचा जो प्रयत्न झाला आहे, त्यालाही शांतपणे डोकं वापरून कायदेशीर मार्गाने उत्तर दिले गेले पाहिजे. लोकभावनेचा दबाव वाढवत त्याच्या माध्यमातून असे विकृत पुस्तकांवर बंदी घालणे हेही आवश्यक आहे. आज जर तसे झाले नाही तर भविष्यात बौद्धिक कंपूगिरी करून गवगवा करत ऐतिहासिक ग्रंथ म्हणून हे पुस्तक प्रस्थापित होईल. तसेच मोठा धोका आहे तो भविष्यात. आज जर बंदी नसेल, तर इतिहासपुरुषांची बदनामी करणारे पुस्तक वादग्रस्त नसलेला संदर्भ म्हणून वापरले जाईल. भविष्यातील धोक्याचा विचार करत त्यावरही कायदेशीर इलाज आवश्यकच! हेही व्हावेच. अर्थात तोडफोड करून कुणाला हिरो न बनवता कायदेशीर मार्गाने. संभाजी छत्रपती हेही करु शकतील. विशेषत: जेव्हा हितसंबंधांचा विचार करत समाजातील बहुसंख्य प्रस्थापित मान्यवर गप्प बसलेत तेव्हा तर ही गरज जास्तच आहे.
जाता जाता पुन्हा तेच. खासदार संभाजी छत्रपतींना नम्रतेनं आवाहन. विखारी राजकारणापेक्षा विचारी राजकारण समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी आवश्यक आहे. आपण असेच जबाबदार नेते म्हणूनच वागा. आपण महाराष्ट्राचे महानेते व्हाल. एवढं नक्की!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite )