तुळशीदास भोईटे/सरळ-स्पष्ट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या झूम मिटिंगमध्ये काय बोलणे झाले ते सांगण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दोन मुद्द्यांवर पत्रकारांना चांगलेच खडसावले. योग्यच केले. पहिला मुद्दा कोरोना सुरक्षा नियम पाळण्याचा उपदेश करणारी माध्यमं स्वत: मात्र ते करताना, नियम पाळताना दिसत नाहीत. हे कुणीतरी करणं गरजेचंच होतं. राज ठाकरेंचा हा उपदेश प्रत्येक पत्रकाराने गंभीरतेने घेतलाच पाहिजे. त्यातही काही झाले तरी स्पर्धेत पुढे राहिलेच पाहिजे या आंधळ्या स्पर्धेतून फिल्डवरचे रिपोर्टर, न्यूजरुममधील पत्रकार सहकारी यांच्या जीवाशी खेळ केला जातो, तो कुठेतरी नियंत्रणात आणायची सुबुद्धी झाली तर उत्तमच!
त्याचवेळी सरकारलाही त्यांनी खडसावले तेही योग्यच. जेव्हा जानेवारीत लाटेची चिन्हं दिसू लागली तेव्हापासूनच तयारी केली असती तर आज रुग्णालयांमध्ये बेड्स मिळत नाहीत, असे झाले नसते. मात्र, हे सारं करतानाच धक्कादायक वाटले, ते त्यांनी अर्णब गोस्वामींचा जो उल्लेख केला त्याबद्दल!
“सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी”
राज ठाकरे म्हणाले, “कसं आहे त्यादिवशी जर माझी पत्रकार परिषद ऐकली पाहिली असेल. तर माझ्यासाठी अनिल देशमुख महत्वाचा विषय नव्हताच. मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली. त्यांनी राजीनामा दिला. तुम्ही विषय विसरून जाल. मी त्यादिवशीही सांगितलं चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण चौकशी ती गाडी कोणी ठेवली त्याचीही झालीच पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “मागच्यावेळी एक सांगायचे राहून गेलं. आमच्या परिचयातील व्यक्ती आहे. त्यांचं गाण्याचा मूड येतो. ते गाणं गातात. काहीवेळा ते तान देतात, एवढी दूर जाते की ते मूळ गाणं विसरतात. मग विचारतात कोणते गाणे होते, मग त्यांना आम्ही गाण्याची आठवण करुन देतो. तुमचं सगळं असं सुरु आहे. मूळ विषय कुठचा निघतो. भरकटत भलतीकडे जातो. आणि कशापासून सुरुवात झाली या गोष्टीची ते आपण बघतच नाही. सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी. कशाचा कशाला काही संबंध? ही जी तुम्ही तान लावली ना त्यामुळे मूळ मुद्दाच गेला!”
अर्णबसाठी तान देताना राज ठाकरेंना अन्वयचा विसर?
राज ठाकरे त्यांच्या शब्दात सांगायचे तर, सुशांत-अर्णबची तान देताना, मूळ विषयच विसरुन गेले. कारण रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली ती काही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नाही. झालेली अटक योग्य अयोग्य ते पुढे कळेल. पण अर्णब गोस्वामींना अटक झाली ती अन्वय नाईक या मराठी व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात. त्याच्या कंपनीचे बिल अर्णब यांच्या कंपनीने दिले नाहीत, असा आरोप करणारे शेवटचे पत्र अन्वय नाईक यांनी लिहिले होते. दोन वर्षे त्या प्रकरणात भाजपाच्या सत्ताकाळात काहीच झाले नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तरी काहीच केले जात नव्हते. अखेर अन्वय नाईक यांच्या पत्नीने आंदोलन केले. सोशल मीडियावर मोहीम राबवली. नेमका त्याचवेळी अर्णब गोस्वामींनी सुशांत प्रकरण, पालघर प्रकरण अशा प्रत्येक मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांविरोधात आक्रस्ताळे, अगदी एकेरी उल्लेख करत शो सुरु केले. त्यानंतर अन्वय नाईकांच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी झाली. त्यात शेवटच्या पत्राचा मुद्दा ग्राह्य धरत मराठी व्यावसायिक अन्वय नाईकांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक झाली. म्हणजे अर्णब नको तसा उपद्रव देत असल्याने महाविकास आघाडीला किमान अन्वय नाईकांना न्याय देण्याचे सुचले असे जरी म्हटले तरी मुळात त्या मराठी व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणाचे गांभीर्य कसे विसरायचे?
अर्णबसाठी दोस्ती निभावताना अन्वय नाईक या मराठी माणसाची आठवण ठेवा!
आत्महत्या केली सुशांतने आणि जेलमध्ये गेला अर्णब असे चेष्टेने सांगत संपूर्ण प्रकरण उडवू लावावे हे योग्य नाही. कदाचित अर्णबने सुशांत प्रकरण लावून धरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असे जरी राज ठाकरे यांना आडून आडून सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्ट तसे म्हणावे. घ्यावी बाजू हरकत नाही. ते कदाचित ते त्यांच्या पक्षाच्या नव्या निर्माणासाठी योग्यही असेल पण तसे म्हणणे वास्तवाला धरुन असेल का? त्यामुळेच त्यांना अर्णबसाठी दोस्ती निभावताना अन्वय नाईक या मराठी माणसाची आठवण करुन द्यायची आहे.
मते देतात मराठी, अस्तित्व टिकवतात मराठी, पुळका अमराठींचा का?
मनसे असो की शिवसेना. या ठाकरे मंडळींचं एक विचित्र धोरण असतं. यांच्या पक्षांसाठी राबतात मराठी माणसं. खरंतर यांनी कितीही रंग बदलले. कितीही भूमिका बदलल्या. तरीही यांना मत देतात ते ९९ टक्के तरी मराठी माणसंच. म्हणजे जी मते मिळालेली असतात त्यांच्या ९९ टक्के. म्हणजेच यांना सत्तेपर्यंत पोहचवात किंवा राजकारणात किमान दखलपात्र ठेवतात ती मराठी माणसंच, पण यांना अनेकदा भरतं येतं ते अमराठींच्याच प्रेमाचं. आज राज ठाकरेंच्या तोंडी अर्णबचं नाव आलं ते एक प्रकारे तो कसा चुकीचा अडकवला गेला ते दाखवण्याच्या प्रयत्नातून असं नसावं, असं वादासाठी गृहीत धरुया. तरी अनवधानानेही एका मराठी माणसाच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील आरोपीबद्दल बोलताना किमान त्या प्रकरणाची योग्य माहिती ठेवली तर जास्त चांगलं. आणि राजकारणापोटी बाजू घेण्याच्या नादात एखाद्या मराठी माणसाला विसरु नये एवढं भानही ठेवणं तर खूपच आवश्यक!! विशेषत: तेव्हा जेव्हा तुम्ही हिंदुत्वाचा नवा झेंडा घेतानाही मराठीवाद सोडला नसल्याचा दावा करतात तेव्हा. तेव्हा तर तुमची ती जबाबदारी असतेच असते.
राज ठाकरेंच्या शब्दात सांगायचं, तर ते अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना उडवून लावताना जे सांगतात तेच सांगावंसं वाटतं, “अभ्यास करूनच आलं पाहिजे!” आणि अर्थाच भान राखूनच बोललंही पाहिजे!!
जाता जाता – राज ठाकरेंना धन्यवाद – बदली प्रकरणातील पत्रकारांना खडसावल्याबद्दल. राजकारणातही तसे दलाल नसावेतच!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क ९८३३७९४९६१ ट्विटर @TulsidasBhoite)
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे.सदैव
याच आविर्भावात असणा-यांचीही आम्ही कानघडणी करु शकतो हे दाखवून दिलंत सर…खूप छान सर…