तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन गळतीमुळे भीषण दुर्घटना घडली. २४ निरपराधांना प्राण गमवावे लागले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. त्यातून खरे दोषी बाहेर यावेत ही अपेक्षा आहे. नाहीतर पीडितांच्या कुटुंबियांचे अश्रू सुकण्याआधीच आपल्याकडे ते प्रकरण विसरवले जाते. मी विसरले नाही म्हणालो. विसरवले जाते असे म्हणालो. कारण माध्यमांना फॉलोअपसाठी वेळ नसतो. आपल्याकडे पीडित कोण आणि आरोपी कोण त्यावरच अनेकांच्या भूमिकाही ठरत असतात. नाशिकच्या बाबतीतही तसेच घडत आहे.
२४ बळी, तरी मोठा मुद्दा नाही!
महाराष्ट्रासारख्या राज्यात एकाच रुग्णालयात एकाच वेळी ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागणे ही खरंतर खूप मोठी बातमी. राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा व्हावा अशीच. पालघरमध्ये दोन साधूंची जमावानं अमानुष हत्या केली त्यापेक्षा जीवांचा विचार करता १२ पट मोठी! पण काल तसं कुठे दिसलं नाही. अपवाद एबीपी माझाच्या अँकर ज्ञानदा कदम आणि नाशिकचे पत्रकार मुकुल कुलकर्णी यांच्यासारख्या मोजक्या पत्रकारांचा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ज्ञानदा कदम यांनी चांगलंच खडसावलं. त्यातही मुकुल कुलकर्णी यांनी जो पत्रकारितेचा बाणा दाखवला त्यांचे कौतुकच केले पाहिजे.
दोष शोधणारे भाजपातील तज्ज्ञ नाशकात भाजपाच्या सत्तेमुळे हिरमुसले असतील!
काल जी दुर्घटना घडली ते रुग्णालय बरं झालं मुंबईत नव्हतं. असं मुंबईकर म्हणून बोलत नाही. तर अशा दुर्घटनांवर राजकारण होऊ नये या भावनेतून बोलतोय. जर ते शिवसेनेची किंवा अन्य भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या ठिकाणचे रुग्णालय असतं तर भाजपाने हे प्रकरण गल्ली ते दिल्ली गाजवलं असतं. त्या पक्षाकडे तशी यंत्रणा, तशी रणनीती, तसे माध्यमवीर आहेत. त्यामुळेच २४ निरपराधांचे बळी गेल्यानंतरही हा मुद्दा फार वादाचा ठरला नाही. पण एक फायदाही झाला असता. ती ऑक्सिजन टाकी, तिचे कंत्राट, त्याची देखभाल यामागील सर्व चेहरे उघडे झाले असते. हकनाक जीव गमावलेल्या २४ जणांचे तेच मारेकरी आहेत. भाजपाचे तसे पोस्टमार्टम करण्यात असणारे सर्वच आक्रमक, तज्ज्ञ, अभ्यासू नेते काल नाशिकमध्ये भाजपाची सत्ता असल्याबद्दल हिरमुसले असतील! त्यामुळेच ते मन मारून गप्प बसले.
प्यादे नाही खरे मारेकरी पकडले जावेत!
आता चौकशी होईल. दोषी कोण ते ठरवले जाईल. ते खरेच दोषी असावेत, एवढी अपेक्षा. प्यादे नसावेत. पण एका मुद्द्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. नाशिकच्या जाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी एक वर्षापूर्वीच बसवण्यात आली. ती कुणी बसवली? तिच्या देखभालीची जबाबदारी कोणावर होती? त्यासाठी जे कामगार, कर्मचारी नेमले होते ते खरंच कौशल्य अवगत असलेले कुशल होते की पैसे वाचवून नफा वाढवण्यासाठीचे अकुशल होते? कारण वर्षभरातच टाकीचा व्हॉल्व्ह खराब होतो याचा अर्थ ते काम दर्जेदार नसावे, हे सांगण्यासाठी तज्ज्ञांचीही गरज नाही. तसेच देखभाल. ती जर झाली असती तर व्हॉल्व्ह खराब झाला नसता. तो खराब होतो आहे, हे देखभाल करणाऱ्यांच्या लक्षात आले असते. त्यामुळेच गरज आहे ते शोधण्याची की ऑक्सिजन टाकी बसवण्याचे, देखभालीचे आणि पुरवण्याचे कंत्राट मिळालेले कोणी राजकारणी तर नाहीत? किंवा कुणाच्यातरी राजकीय संबंधांतून कंत्राट दिले गेले होते का? काल पासून पाळलं जात असलेलं मौन संशय वाढवणारे आहे.
डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल ऑक्सिजन लीकमुळे हा:हाकार#नाशिक महानगरपालिकेने O&M तत्वावर ठेकेदाराला ऑक्सिजन प्लांट चालवायला दिला होता का? दिला असल्यास वर्षाकाठी किती ₹ महापालिका ठेकेदाराला मोजत होती. २२ निष्पाप नाशिकरांच्या मृत्यूस कारणीभूत
सर्व नीच दोषींना जाहीर फाशीज द्या.@my_nmc— Devang Jani (@devangjaani) April 21, 2021
दुर्घटनेचं राजकारण नसावंच, पण दोषींनाही सोडू नका!
अशा दुर्घटनेचं राजकारण करु नये. काल दरेकरांनी करु पाहताच आधी ज्ञानदा आणि नंतर मुकुल यांनी त्यांना फटकारलं ते त्यामुळेच योग्य. त्यातही भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात एवढी भीषण दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर लगेच आयुक्तांवर जाणाऱ्या दरेकरांना खडसावणे आवश्यकच होते.
आता भविष्यातही दरेकर राजकीय सत्ताधाऱ्यांऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच दोष देण्याची भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे. खरंतर तसंच असतं. राजकारण्यांपेक्षा नोकरशहाच जास्त दोषी असतात. कारण ते त्यांच्या सोयीने सारं करतात. पण सॉफ्टटार्गेट ठरणारे राजकारणी काही सत्पुरुष असतात असे नाही. पण अनेक राजकारणी राजकीय स्वार्थापोटी दुर्घटनांनंतरही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण करण्यातच व्यग्र असतात. स्वत:वर आलं की मौन बाळगतात. तसंच आपल्याकडे दाखवण्यासाठीच खूप चालतं. आर्ट ऑफ लिव्हिंग असतं तसंच आर्ट ऑफ प्रेझेंटेशनचे मास्टर्स सध्या दिसतात.
नाशिक मनपाचं सतर्कतेचं नाटक
तसे घडू नये, असे वाटत असल्यानेच थोडं आपल्याला केवळ दाखवण्याच्या नाटकातूनही बाहेर आले पाहिजे. नाशिक मनपाचा एक व्हिडीओ पाहायला मिळाला. त्याच नाशिक मनपाचा जिच्या रुग्णालयात एवढे बळी गेले. त्या व्हिडीओत कोरोना संकटात कोरोना उपचार केंद्रांमध्ये काही आपत्ती उद्भवली तर सामना करण्यासाठी प्रशिक्षण देताना दाखवले आहे. एक फायर एक्स्टिंग्युशर. अनेकांना दिला जातो. तो एकच सर्वांना पुरला पाहिजे म्हणून थोडं फुस्स झालं की थांबवायला सांगितले जाते. किमान प्रशिक्षण देताना ते घेणारे प्रशिक्षित व्हावेत एवढे तरी दिले पाहिजे. नाही तर सतर्कता हा शब्द केवळ वापरण्यापुरताच वाटतो.
अग्निशमन दलाकडून मनपाच्या सर्व कोविड केअर सेंटर मध्ये आपत्कालिन बचाव प्रशिक्षणास प्रारंभ
राज्य भरातील विविध कोविड केअर सेंटर मध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आगीच्या घटना घडू नये यासाठी नाशिक महानगरपालिका सतर्कता बाळगत आहे. pic.twitter.com/u1dnHDJ3HJ
— Nashik Municipal Corporation (@my_nmc) April 19, 2021
राजकारणाचंच लॉकडाऊन करा!
एकच अपेक्षा आहे. सर्वांकडूनच. राजकारण होत राहतं. किमान आता कोरोना संकटापुरतं तरी ते थांबवा. सर्वच वाईट असे कधीच म्हणणार नाही. तसे नसतेच. बहुतेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटीही, आणि राजकीय नेतेही खूप चांगले काम करत आहेत. पण काही राजकारण एके राजकारण करतात. नको ते वाद घालतात. त्यांना नम्र आवाहन आहे. आता एक व्हा. नाशिकसारख्या दुर्घटना माणुसकीविरोधातील गुन्हे माना. योग्य तपास करुन मारेकऱ्यांना अद्दल घडवा. मग ते कोणत्याही पक्षाचे असले तरीही.
तसेच लोक मरतात त्यांच्याकडे हवंतर स्वार्थाने मतदार म्हणूनच पाहा. पण त्यांचे जीव वाचवा. मतदार वाचले तर मतं मिळतील. तुमच्या सत्तेतल्या किंवा विरोधातीलही गाद्या शाबूत राहतील. त्यामुळेच आता राजकारणही लॉकडाऊन करा! कोरोनाशी लढा! माणुसकी दाखवाल तर माणूस जगणार आणि कोरोना हरणार!
तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ www.muktpeeth.com या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – 9833794961 ट्विटर – @TulsidasBhoite