तुळशीदास भोईटे/सरळस्पष्ट
आपल्याकडे कधी, कशावर आणि कसं राजकारण होईल ते सांगता येत नाही. सध्या लसीकरणाला राजकारणाचा संसर्ग झाल्याचं दिसतंय. लसीकरणाचं राजकारण रंगले आहे. खरे तर कोरोना ही मानवजातीवर आलेली आपत्ती. एखादे महानगर, जिल्हा, राज्य अशा परिघात विचार करणे चुकीचे ठरेल. पण आपल्याकडे तसे झाले. होत आहे. कदाचित होतही राहील. लसीचं राजकारण सध्या कोरोनापेक्षा जास्त उफाळले आहे. मात्र, त्याचवेळी कोरोना उपचाराकडे दुर्लक्ष होता कामा नये.
लस आता आली आहे. ती पूर्णपणे यशस्वी आहे हे सिद्ध व्हायचे आहे. सर्वांना मिळण्यासाठी तर खूप काळ जाईल. त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. पण तोपर्यंत जे बाधित झाले त्यांच्या उपचारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसं होत आहे, असे काही उदाहरणांवरून दिसू लागले आहे. लसीकरणाच्या वादात अडकलेल्या राज्यकर्त्यांचे त्यांच्या स्वत:च्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ नये. तेही पुन्हा हाती अधिकार असताना तर नाहीच नाही.
काल रात्री उशिरा नांदेडमधील किनवटच्या शुभम शिंदे या तरुण पत्रकाराचा फोन आला. त्याने तेथे कोरोना उपचारासाठी असलेल्या भयान अवस्थेचे वर्णन केले. त्याने जे सांगितले ते त्याच्याच शब्दात मांडतो.
किनवटमध्ये कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष
सर, किनवटमध्ये कोरोना रुग्णांना सर्वांनीच वाऱ्यावर सोडले आहे. उपचाराच्या नावाखाली जेथे ठेवतात, तेथे निकृष्ट जेवण मिळते आणि घाणीच्या साम्राज्यानेही रुग्ण हैराण झाले आहेत.
कोरोनावर मात करायची असल्यास सकस आहार गरजेचा असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांना कोणत्या प्रकारचा आहार द्यायला हवा यासाठी सरकारने नियमावलीही काढली आहे. मात्र किनवटमध्ये कोरोना रुग्णांना तसा सकस आहार मिळत नाही.
किनवट तालुका हा नांदेड जिल्ह्यापासुन जवळपास १५० किमी अंतरावर आहे. मुख्यत्वे आदिवासीबहुल डोंगराळ तालुका अशी किनवट तालुक्याची ओळख. बहुधा याच कारणामुळे की काय प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे रुग्णालयाची स्वच्छता आणि रुग्णांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. उपचार केंद्रात अंधाराचं साम्राज्य, त्यात विनाबेड जमिनीवरती लोळत पडलेले कोरोना रुग्ण अस मन हेलावणारं भयान चित्र सध्या किनवटच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळतंय.
विज, स्वच्छता,कर्मचारी संख्या अशा एक ना अनेक समस्या किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात असल्याने येथील रुग्णांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालयापासून १५० किमीचे असणारे अंतरामुळे अनेक खेड्यातील रुग्ण या ठिकाणी भरती होतात. पण इथे असलेली परिस्थिती पाहून आपण सुखरुप घरी जाऊ का नाही असा प्रश्न या रुग्णांना पडलाय.”
शुभमने रात्री हे सांगितले. पुन्हा त्याने एक माहिती दिली ती आडगावच्या माणसांकडे आपण माणसं म्हणून पाहत नाही की काय अशी वाटायला लावणारी. त्याने जे सांगितले ते मांडणारा किनवटच्या उपचार केंद्रातील एका रुग्णाचा व्हिडीओ त्याने पाठवला. त्यात एक रुग्ण सांगतोय, “ते म्हातारं आता गेलं. तेथे बाहेरच लघवी केली त्याने फिल्टरच्या पाण्यापाशी. बरोबर आहे का? अंधारामुळे त्याने तेथेच लघवी केली. फिल्टरच्या पाण्यापाशी. लाइट नाही. त्यामुळेच.”
शुभम म्हणाला त्या वृद्ध रुग्णाला नजरेची समस्या आहे. खरंतर एखाद्या कर्मचाऱ्याने लघवीसाठी नेणे आवश्यक होते. मुळात तेथे अंधार असूच नये. पण आपल्याकडे संवेदनशीलतेचा प्रकाश नसतो, त्यामुळे लख्ख प्रकाशातही असंवेदनशीलतेचा अंधार खुपतो. तेथे तर अंधारच होता.
ही सारी परिस्थिती भयानक आहे. शुभमने रुग्णांच्या जेवणाविषयीही तक्रारी असल्याचे सांगितले. खरंतर रुग्णांच्या उपचारात आहार हा महत्वाचा घटक. अनेक ठिकाणी नेमका त्या आहारातच घोळ केलेला दिसतो. मागे एका उपचारकेंद्रातील निकृष्ठ उपचार केंद्रातील आहाराकडे एका मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. त्यांनी रुग्णाच्या मोबाइलवर कॉल केला. ठेकेदाराला, अधिकाऱ्याला कॉन्फरन्स कॉलवर घेतले. झापझाप झापले. उद्धार केला. काही दिवसांनी चौकशी केली तर कळले मंत्रिमहोदयांनी ‘नायक’चा आव आणून झापलं खरं पण फरक काहीच नाही पडला! फॉलोअप महत्वाचा असतो. संवेदनशीलता उक्तीत नाही कृतीत दिसली पाहिजे!!
परवा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका रुग्णालयाच्या स्वयंपाक्याच्या कानशिलात लावली. वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे मुक्तपीठच्या माध्यमातून अभिव्यक्त झाले. त्यांनी बच्चूभाऊंना जे बजावले ते योग्यच! बच्चू कडूंनी स्वयंपाक्याच्या नाही व्यवस्थेच्या थोबाडात मारावे! पण एकट्या बच्चू कडूंनीच नाही. सर्वांनीच. मग त्यात सत्ताधारी जसे येतात तसे विरोधकही येतात.
नेमके घडते ते हेच. भाजपा टीका करते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीवर. हे तीन आघाडी पक्ष टीका करतात भाजपावर. यातील कुणीही व्यवस्था बदलण्यासाठी मात्र प्रयत्न करीत नाही. केवळ वादळ उठवायचं, एकमेकांना हाणल्यासारखं करायचं, पण साध्य त्यातून काहीच होत नाही.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी किनवटला आपलं मानावं. किनवटला म्हणजे फक्त किनवटला नाही. किनवटसारख्या आडगावातील त्या प्रत्येक उपचार केंद्राला. हे तुमच्याच अधिकारातील आहे. तुमची जबाबदारीच आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातीलच किनवटसारखे दुर्लक्षित भाग आहेत. तेथे कोणतेही मोदी आणि फडणवीस आडवे येणार नाहीत. लस नाही. अपुरी आहे. महाराष्ट्राशी भेदभाव हे दिल्लीचे शतकानुशतकांचे वैशिष्ट्य. चुकीचे वागतील तर पेरलेले उगवते तसे त्यांना ते भोवेलच. पण लस नाही तर नाही. किमान प्राथमिक उपचार तरी करून लोकांचे जीव वाचवणे आपल्या हाती आहे.
किनवट हे फक्त एक उदाहरण आहे. अशीच स्थिती महाराष्ट्रातील अशा अनेक दुर्लक्षित भागात असेल. किमान एक करता येईल. स्थानिक आमदार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, जिप पदाधिकारी यांची एक देखरेख समिती नेमावी. या समितीला कोरोना उपचार देखरेखीची आणि काही कमतरता असेल तर ती दूर करण्याची जबाबदारी द्यावी. आमदार-खासदारांनी आपल्या निधीतून उपचार केंद्रांमध्ये सोयी-सुविधा द्याव्यात. अर्थात असं करताना राजकारण बाजूला ठेवावे लागेल. लोकांचे हाल टाळण्यासाठी आपल्या राजकीय स्वार्थाचा संसर्ग दूर राखावा लागेल. ते जमेल का हाच खरा प्रश्न आहे.
राज्य पातळीवरही हाच प्रयोग करावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य मंत्री राजेश टोपेंसह लस पुरवठा समन्वयाची जबाबदारी द्यावी. दिल्लीतील संपर्क वापरून करतील ते काही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना ऑक्सिजनची जबाबदारी द्यावी. सर्वांची ऊर्जा सकारात्मक वापरली जावी.
काल जितेंद्र आव्हाड म्हणाले उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवते. राजेश टोपे क्षणाचीही उसंत न घेता गेले वर्ष दीडवर्ष राबताना दिसतात. पण या साऱ्यांनी आता केंद्राशी लढण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये. अनेकदा टीकेत अडकवून ठेवणे हे वेळ-ऊर्जा वाया घालवण्याचे माइंड गेमही असतात. पण तुम्ही आता त्यात अडकू नका. आवाज उठवाच. पण जे हाती आहे ते करून, वाट्टेल ते करून आपली संवेदनशीलता कृतीतूनही दाखवलीच पाहिजे. शेवटी आपलं कुटुंब ही आपलीच जबाबदारी आहे. किनवटसारखे दुर्लक्षित भागही आपल्या महाराष्ट्र नावाच्या कुटुंबातीलच आहेत!
तुळशीदास भोईटे www.muktpeeth.com ‘मुक्तपीठ’चे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
Shubham shinde या तरुण पत्रकाराची स्तुती करावी तेवढी कमीच आहे, आरोग्याशी संबंधित ज्या उणीवा स्थानिक लोकप्रतिनिधीनी शोधव्यात, त्या शुभम शिंदेनि प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल्या. किनवट सारख्याडोंगराळ व आदिवासी बहुल भागावर सरकारच लक्ष कमीच असतं. आज खरंच गरज आहे माझ्या तालुक्याला शुभम शिंदे सारख्या नवतरुण पत्रकारांची… पुनःश्च धन्यवाद शुभम शिंदे 🙏🙏🙏🙏