तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
जेव्हा वरचे साथ देत नसतात. तेव्हा हताश होऊन आरडोओरडा करणे फार तर सहानुभूती मिळवून देऊ शकते यश नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी, तुमच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठीही यश मिळवावंच लागेल. कोरोनाविरोधातील लढाई जिंकावीच लागेल. त्यासाठी रडून नाही आता शक्य ती साधने आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करत लढूनच कोरोनावर मात करावी लागेल.
तेच भाजपालाही सांगणे. विरोधी पक्षात आहात, विरोध कराच. पण विरोधासाठी विरोध नसावा. लोकांच्या मृतदेहांचा खच रचून जर त्यावर सत्तेचे सिंहासन उभारायचे असेल तर त्यापेक्षा हे सरकारच बरखास्त करा. माणसांच्या जीवापेक्षा सत्ता मोठी नसते. माणसं राहिलीत तर राज्य राहिल. देश राहिल. केवळ भूभाग म्हणजे देश नाही. माणसं आणि इतर सर्व असतं तेव्हा देश घडतो. नाही तर सारंच बिघडतं.
त्यासाठीच सर्वांना विनंती. कोरोनाप्रमाणेच राजकारणाचे विषाणूही मारा! लोकांचे जीव वाचवा!!
एकीकडे कोरोना संसर्गाचा सुळसुळाट. त्यात काळजी घेऊनही किंवा अनवधाने किंवा अगदी बेपर्वाईमुळेही कोरोनाचा संसर्ग झाला तर जायचं कुठं असा प्रश्न आता कोरोनाबाधितांसमोर, त्यांच्या जीवलगांसमोर पडतो आहे. श्वास घेण्यासही फुर्सत नसताना आपले डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक कसलीही तक्रार न करता कोरोनाशी लढत आहेत. ते हतबल तेव्हा होतात, जेव्हा त्यांनी बरे करत आणलेले रुग्ण ऑक्सिजनच्या अभावाने तडफडत मरताना दिसतात. तसेच काही ठिकाणी डॉक्टरांच्या नाही पण रुग्णालय प्रशासन आणि त्यांच्या डोक्यावर बसलेले राजकारणी यांच्या बपर्वाईमुळे रुग्णालयात भीषण दुर्घटना घडतात. मग कधी टंचाई असणाऱ्या ऑक्सिजनची गळती होते तर कधी रुग्णांसाठी शेवटचा उपाय मानले गेलेले अति दक्षता कक्षच कुणाचे लक्ष नसल्याने लाक्षागृहासारखे जळून खाक होतात. रुग्णालयेच मृत्यूचे सापळे ठरू लागली आहे. पुन्हा ते एकाच ठिकाणी घडते आहे, असेही नाही. सगळीकडे घडते. गल्ली ते दिल्ली सारखेच चित्र. मन सुन्न करणारं.
आज सकाळी महाराष्ट्रात तरी कुणाला चहा गोड लागला नसणार. सकाळ झाली तीच आपल्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या भीषण आगीत रुग्णांचे बळी गेल्याची बातमी घेऊन. नातेवाईकांचा टाहो ऐकवत नाही.
तेवढ्यात बातमी आली दिल्लीहून. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालय. खूप मोठे रुग्णालय. तेथे गेल्या २४ तासात २५ कोरोना रुग्णांनी प्राण गमावले. शेवटचा श्वास घेतला असेही लिहू शकत नाही. कारण तो घेण्यासाठीही त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही.
रुग्णालयांचे मृत्यूचे सापळे आज झालेले नाहीत. महाराष्ट्रात याआधी भंडाऱ्याच्या सरकारी रुग्णालयातील नवजातांच्या वॉर्डाला आग लागली. जीव वाचवण्यासाठी जेथे ठेवले तेथेच त्यांचे होरपळून बळी गेले. मुंबईच्या सनराइझ या खासगी रुग्णालयातही आगीनेच होरपळून रुग्णांचे जीवन संपले. नाशिकमध्ये मनपाच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली. २४ रुग्णांचे ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू ओढवला. त्यानंतर आता विरार. त्यानंतर दिल्ली. कुठे आग तर कुठे ऑक्सिजनचा अभाव. रुग्णांसाठी जीव वाचवणारी रुग्णालयेच मृत्यूचे सापळे ठरु लागलीत.
प्रथम आगीचे. रुग्णालयेच नाहीत अगदी साधे काही काम सुरु करायचे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी लागते. त्यासाठी स्थानिक अग्निशमन दलाचे तपासणीनंतर ना हरकत प्रमाणपत्र लागते. भंडारा सरकारी रुग्णालय. भाजपाच्या सत्तेत निवडणुकीच्या मोसमात घाईत सुरु झाले. काही कोणी काळजी घेतली असेल असे नाही. मुंबईच्या सनराईझमध्येही जी स्थिती होती, रुग्णालयाच्या आपत्कालीन प्रवेशद्वारावर मॉलच्या व्यवस्थापनाने जे कचऱ्याचे ढीग ठेवले होते ते पाहिले तर शिवसेनेची वर्षानुवर्षे सत्ता असेलेल्या मुंबई मनपात अग्निशमन तपासणी होत असावी का याबद्दलच शंका वाटते. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातही तसेच झाले असावे. अति दक्षता कक्ष. एसीचा स्फोट. होऊ शकतो. पण त्यानंतरची हानी रोखण्यासाठी काहीच व्यवस्था कशी नाही? हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची वर्षानुवर्षे एकहाती सत्ता. कशी सक्षम यंत्रणा आजवर उभा राहिली नाही? भंडारा, मुंबई आणि विरार तीन ठिकाणी समान अनुभव. आग विझवणारी सक्षम व्यवस्थाच नाही. सुटकेसाठीही नाही.
आता ऑक्सिजनकडे वळुया. लाज वाटावी असेच सारे. नाशिकमध्ये एक वर्षांपूर्वी उभारलेली टाकी. तिचा व्हॉल्व्ह खराब होतो. गळती होते. २४ रुग्ण तडफडून मरतात. मुळात उभारणी, देखभाल सारेच संशयास्पद. कंपनी कोणतीही असो. मधले कोण? ते गेल्या सरळस्पष्टमध्ये मांडले. गावभर ओरडत फिरणाऱ्या भाजपाची तेथे सत्ता तरी असं कसं झालं? आता मुद्दा पर्यायी व्यवस्थेचा.
दुर्घटना घडू शकते. एखाद्या वेळी ऑक्सिजनचा टँकरच येणार नाही, असेही घडू शकेल. पण मग पर्यायी व्यवस्थाच कशी नाही? काय करावं डॉक्टरांनी? नजरेसमोर तडफडत मरताना पाहायचं? रुग्णांच्या नातेवाईकांप्रमाणेच डॉक्टर, नर्स आरोग्य रक्षकांवर हे मानसिक आघातच. मानसिक समस्या उद्भवतील असे.
हे झाले दुर्घटनांचे. पण देशातच राजकारणाच्या नादात महादुर्घटना घडतेय, घडवली जातेय त्याचे काय? एवढा मोठा देश. महाशक्ती बनण्याची महत्वाकांक्षा. आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन पुरवू शकत नसेल. तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. त्यातही कोरोना संकटात सर्व काही आपल्या हाती केंद्रीत करून बसलेल्या दिल्लीशहांना तर जरा जास्तच!
कोरोनासाठी मी कधीच कोणत्या राजकारण्याला दोष दिला नाही. कारण ही जागतिक आपत्ती आहे. त्यात सामान्यांचा, सुशिक्षितांचाही बेपर्वाई प्रचंड. ती सर्वांनाच भोवते आहे. पण जरी आपत्तीसाठी जबाबदार धरत नसलो तरी ती वाढवण्यासाठी आणि ती आल्यानंतर योग्य व्यवस्था जे करत नाहीत त्यांना त्यांच्या बेजबाबदारीसाठी जबाबदार धरलेच पाहिजे. कारण कोरोना काही भूकंप नाही. भूकंपासारखी न सांगता अचानक येणारी आपत्ती नाही आहे ही.
पहिल्या लाटेचे समजू शकलो. तेव्हा काही माहितच नव्हते. आता दुसऱ्या लाटेच्यावेळी तसं नाही. काय लागते ते माहित होते. कसा संसर्ग झपाट्याने पसरतो हेही माहित होते.
जानेवारी-फेब्रुवारीपासून चाहूल लागली. तरीही गाफिल राहिलात. ऑक्सिजनची व्यवस्था करणे. त्यातही ऑक्सिजनच्या वितरणाची व्यवस्था उभी करण्यास खूप वेळ होता. काहीच केले नाही. निवडणुकांचे प्रचार, कुंभमेळ्यांची गर्दी जमू देऊन आपल्या हिंदू धर्माला धोक्यात आणण्याचे पाप, विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या ठिकाणी आरोपांची राळ उठवत अपप्रचार, यातच व्यग्र राहिलेत देशाचे सत्ताधारी भाजपा नेते. जेव्हा एखादे सरकार फक्त निवडणूककेंद्री होते तेव्हा काय संकट ओढवते ते आता आपण भोगतो आहोत.
देशातील संकटात सामान्यांना योग्य उपचार, साधा ऑक्सिजन, रेमडेसिविर न मिळण्यासाठी जर केंद्रातील भाजपा जबाबदार आहे तसेच राज्यासाठी आघाडीचे नेतेही हात वर करु शकत नाही. मान्य आहे. तुम्हाला भाजपाचे दिल्लीशहा सावत्रपणे वागवतात. सत्तेच्या वखवखीतून स्थानिक भाजपा नेते राजकीय गदारोळ करतात. पण तुम्हाला काही करण्यापासून कोणी रोखले होते. जानेवारी-फेब्रुवारीपासून कोरोनाची चाहुल लागताच जिल्ह्या-जिल्ह्यात का नाही औरंगाबाद, कोल्हापूर गडहिंग्लजप्रमाणे रुग्णालयांपुरते तरी ऑक्सिजन प्लांट उभारलेत? का नाही आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण केले?
आता रेमडेसिविर मिळत नाही. लसींसाठी कोंडी केली जाते. हे सारं सारं लोकांना कळतं. भाजपा जर तसं जाणीवपूर्वक करत असेल तर लोक त्यांना योग्य ते प्रायश्चित देतील. पण तुमचं कर्तव्य तर तुम्ही पार पाडा. किमान लोकांना इतर गोष्टी तर पुरवा. काही लाखांचे ऑक्सिजन प्लांट उभे करणे अवघड नव्हतेच. आमदारनिधीतूनही ते करता आले असते. आणि आताही करता येईल. अर्थात वेळ जाईल.
जेव्हा वरचे साथ देत नसतात. तेव्हा हताश होऊन आरडोओरडा करणे फार तर सहानुभूती मिळवून देऊ शकते यश नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी, तुमच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठीही यश मिळवावंच लागेल. कोरोनाविरोधातील लढाई जिंकावीच लागेल. त्यासाठी रडून नाही आता शक्य ती साधने आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करत लढूनच कोरोनावर मात करावी लागेल. महाराष्ट्रातील आघाडी सरकार आपल्यापरीने करत आहे. पण केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या डाव-प्रतिडावांना उत्तर देण्याचे काम राजकीय प्रवक्त्यांना करु द्या. मंत्र्यांनी त्यात वेळ घालवू नये. त्यांनी आणखी काम वाढवावे. गरज त्यांची आहे.
तेच भाजपालाही सांगणे. विरोधी पक्षात आहात, विरोध कराच. पण विरोधासाठी विरोध नसावा. लोकांच्या मृतदेहांचा खच रचून जर त्यावर सत्तेचे सिंहासन उभारायचे असेल तर त्यापेक्षा हे सरकारच बरखास्त करा. माणसांच्या जीवापेक्षा सत्ता मोठी नसते. माणसं राहिलीत तर राज्य राहिल. देश राहिल. केवळ भूभाग म्हणजे देश नाही. माणसं आणि इतर सर्व असतं तेव्हा देश घडतो. नाही तर सारंच बिघडतं.
आता रेल्वेतून ऑक्सिजन एक्प्रेसमधून ऑक्सिजन टँकर आणणे असे प्रयत्न सुरु झालेत. नितीन गडकरींनी नागपुरासाठी काही वेगळे प्रयत्न केलेत. आज चंद्रकांत पाटील यांनीही बेडची व्यवस्था करण्याची घोषणा केली. जर आघाडी सरकार काही करत नसेल तर तुम्ही त्यांची कोंडी करत न बसता अशीच सकारात्मक कामे वाढवा. कोणी रोखलंय? लोक पाहत असतात, ते नोंद घेतात हे लक्षात ठेवा.
त्यासाठीच सर्वांना विनंती. कोरोनाप्रमाणेच राजकारणाचे विषाणूही मारा! लोकांचे जीव वाचवा!!
तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ www.mukpeeth.comचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 कृपया थेट कॉल करा ट्विटर @TulsidasBhoite